बंद

जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 24/08/2020

कोरोना संकट रोखण्यात वैद्यकीय क्षेत्राचा मोठा वाटा

डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेणार नाही

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- कोरोना संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर वेळेत योग्य उपचार व्हावेत, यासाठी संपर्कातील रुग्ण शोधणे, त्यांची चाचणी करणे आणि त्यावर तत्काळ उपचार करणे या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोना संसर्गाचा अटकावासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना रोख स्वरूपातील दंडासह मास्क देण्यात येणार आहे. मास्क वापरणे प्रत्येक नागरिकांसाठी बंधनकारक आहे, त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. समाजाचे देणे लागतो, या भूमिकेतून अधिकाधिक खासगी रुग्णालयांनी या संकटाच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात समाजाला परत देऊ या संकल्पनेवर आधारीत जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांशी जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, वर्षाराणी भोसले, संगीता सानप, डॉ.प्रवीण सूर्यवंशी, डॉ. अन्नदाते, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. सौरभ राव आदींची उपस्थिती होती

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पसरत आहे. लोकांच्या मनामध्ये कोरोना आजाराबाबत भिती निर्माण झालेली आहे. भिती दूर करण्यासाठी वैद्यकीय सेवेतील सर्व डॉक्टरांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असणे आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास 74.03 टक्के कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर 3.02 टक्के मृत्यू दर आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात डीसीएच, डीसीएचसी, सीसीसीमध्ये पुरेशाप्रमाणात सुविधा आहेत. मात्र, जिल्ह्यात यापुढे बाजारांची गावे (ग्रोथ सेंटर) व इतर ठिकाणीदेखील मोठ्याप्रमाणात नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी देखील कोरोना रुग्ण तपासणीसाठी व उपचारासाठी पुढाकार आल्यास त्यांच्या वैद्यकीय सेवांचा प्रशासनास हातभार लागेले. जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय रुग्णालयांनी कोरोना संकट रोखण्यासाठी पुढाकार घेतल्यानेच येथील रुग्ण बरे होण्याचा दर 74 टक्के आहे. यामुळे या जिल्ह्यातील मोठ्याप्रमाणात प्रसार झालेला कोरोना आजार बरा करण्यात वैद्यकीय क्षेत्राचे मोठे योगदान आहे. तसेच त्यांच्या काही अडचणी देखील आहेत, त्याही सकारात्मकपणे सोडविण्यासाठी प्रशासन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब असून याबाबत प्रशासन गंभीरपणे दखल घेऊन योग्य ती कडक कारवाई करेल, असेही श्री. चव्हाण म्हणाले. बैठकीत गृह विलगीकरणाचा पर्याय, लोकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत श्री. चव्हाण यांनी प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यातील रुग्णालये, जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्ण, रुग्णालयनिहाय मृत्यू, प्रशासनाचे प्रयत्न आदींबाबीचा समावेश होता.

तसेच भारतीय लष्करामध्ये जखमी सैनिकांबाबत ज्याप्रमाणे वैद्यकीय सुविधांचा प्रोटोकॉल आहे. त्याचधर्तीवर ‘कोरोना योद्धा’ व त्याच्या परिवारास तत्काळ आवश्यक ती मदत होऊन त्यांचे आत्मबल वाढावे, कोरोना-19 या संसर्गाच्या अनुषंगाने कामकाज करताना त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासन आहे, अशी त्यांच्यात भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ‘कोरोना योद्धा’, त्यांच्या परिवारास तत्काळ मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रतिसाद कक्षाची’ स्थापना करण्यात आलेली आहे. उद्यापासून हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी डॉक्टरांना सांगितले.

तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले म्हणाले, सध्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, सणामुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो, खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वोतोपरी उपाययोजना करत आहेत. मात्र, ग्रामीण भागात प्रशासनाला काही प्रमाणात मर्यादा येतात, तरी समाजाचा एक भाग म्हणून खासगी डॉक्टर्स, रुग्णालयांनी सामाजिक दायित्वाच्या हेतूने ग्रामीण भागातील सेवा करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी उपस्थित डॉक्टरांना केले.

यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्राने उचलेला वाटा याबाबत डॉ. सूर्यवंशी यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. अमोल अन्नदाते यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समाजात जागृती निर्माण होणे आवश्यक आहे, असे सांगितले. डॉ. सौरभ राव, डॉ.यशवंत गाढे, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. हिमांशु गुप्ता, डॉ. अनंत पंढरे आदींनी सूचना मांडल्या.

जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक