बंद

जिल्ह्यातील कोरेानाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट – अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे

प्रकाशन दिनांक : 10/05/2021

औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका)- ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करुन शहरात कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी येण्याचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य यंत्रणेने समन्वयाने काम करावे. नियमांचे पालन केल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्येत लक्षणीय घट झाल्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती कक्षात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थित लोकप्रतिनिधींना माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या लोकप्रतिनिधी सोबतच्या आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी खा. डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके, आ. हरीभाऊ बागडे, आ. संजय शिरसाठ, आ. अतुल सावे, आ. उदयसिंह राजपूत, आ. अंबादास दानवे, यांच्यासह महानगर पालिक आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोगय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी श्री.गव्हाणे यांनी जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होण्यासाठी लॉकडाऊन, नागरिकांचे सहकार्य तसेच लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्युदर नियंत्रणात आणण्यामध्ये प्रशासनाला काही प्रमाणात यश आले आहे. तसेच ऑक्सिजन उपलब्धेतसाठी अतिरिक्त साठ्याची मागणी शासनाकडे केली असून ऑक्सिजनचा पुरेसा साठा जिल्ह्याला उपलब्ध झालेला आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन वितरणाच्या नियोजनासाठी संबंधित रुग्णालयांनी किमान दहा तास आगोदर ऑक्सिजनची आगाऊ मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यन्वित असलेल्या ऑक्सिजन नियंत्रण कक्षास कळवावी. जेणे करुन ऑक्सिजन अभावी रुग्णांची होणारी गैरसोय टाळता येईल.

मनपा आयुक्त श्री. पाण्डेय म्हणाले की नोंदणीकृत फेरीवाल्यांना शासनाने जाहिर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास सुरूवात झाली असून येत्या काही दिवसात संपूर्ण नोंदणीकृत लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

खा. डॉ. कराड म्हणाले की शहरातील इंटर्नशिप डॉक्टरांना स्टायपेंडमध्ये कोविड इंटेनसिव्ह म्हणून वाढीव स्टायपेंड देण्याबाबत टास्क फोर्स समितीकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत सूचना केली. जेणे करुन आरोग्य यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपचारात या डॉक्टरांची मदत होईल.

खा.इम्तियाज जलिल यांनी पंतप्रधान सहायता निधीतून मिळालेल्या व्हेंटिलेटरची पूर्ण क्षमतेने वापर व्हावा यासाठी यातील तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करुन कोरोनाबाधित रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्याचे आरोग्य यंत्रणेला सूचित केले.

आ.संजय शिरसाठ म्हणाले की, काही रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या उपचाराचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने कार्यवाही करुन रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आढावा बैठकीत केली.

जिल्ह्यातील कोरेानाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट