बंद

जिल्ह्याच्या व्यापक विकासासाठी केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

प्रकाशन दिनांक : 20/10/2020

  • राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची समितीव्दारे पाहणी करणार
  • प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तातडीने द्यावा.

औरंगाबाद, दि.19 (जिमाका) :- जिल्ह्याच्या व्यापक विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, कौशल्य विकास, महामार्ग विकास यासह इतर विविध केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियत्रण समिती (दिशा) चे अध्यक्ष तथा ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास  समन्वय  व सनियंत्रण  समिती (दिशा) ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा ग्राहक व्यवस्था, अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तेव्हा ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार  इम्तियाज जलील, खा. डॉ. भागवत कराड, समिती सदस्य तथा जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते. यांच्यासह बैठकीस आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, आ.अतुल सावे, आ. उदयसिंह राजपुत, आ.रमेश बोरनारे, तसेच नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि संबंधित  लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ  अधिकारी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. दानवे यांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत तातडीने पात्र लाभार्थ्यांना घरकुल अनुदान देऊन घर बांधण्यास सहाकार्य करावे, असे सूचित करुन जिल्हयांतर्गत रस्ते तसेच महामार्गाच्या कामांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्याचे निर्देशित करुन समिती सदस्यांच्या समवेत थेट कामाच्या ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण पथकासोबत पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेच्या कामामध्ये तक्रार प्राप्त प्रकरणात तातडीने जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी प्रक्रिया सुरु करावी, असे सूचीत करुन शेतकऱ्यांना कृषी कामांमध्ये वीज पुरवठयात अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी महावितरणने घ्यावी. ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी तत्पर पर्यायी व्यवस्था उपलब्ध ठेवावी, असे निर्देशित करुन श्री. दानवे यांनी सर्व ग्रामपंचायतींना  डिजीटल इंडीया पब्लिक एक्सप्रेस योजनेंतर्गत ब्रॉडबँड दूरसंचार सेवा विहीत मुदतीत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत सर्व कामे प्राधान्याने विहीत मुदतीत पूर्ण करावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधितांकडून तातडीने पाठपुरावा करुन कामे पूर्णत्वास न्यावी, असे श्री. दानवे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनांतर्गत जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळवून द्यावा, तसेच लाभार्थ्यांना नजीकच्या परिसरातच गॅस सिलेंडर भरुन मिळेल अशी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी श्री. दानवे यांनी सूचित केले. जिल्ह्यात शेतकरी, ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत सर्व मूलभूत सोयीसुविधा गुणवत्तापूर्ण उपलब्ध करुन द्याव्यात. सिंचन विषयक सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन श्री. दानवे यांनी सविस्तरपणे लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकुन घेत  संबंधित विभागाने केलेली कार्यवाही, त्यातील अडचणी जाणून घेत तातडीने काम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांना सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात सर्व योजनांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विकास कामांबाबत माहिती देऊन प्रलंबित कामे संबंधित विभागाकडून कालमर्यादेत पूर्ण करुन घेतल्या जातील, असे सांगितले.

मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी सफारी पार्क, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट सिटी बस, सायकलिंग ट्रॅक, प्रधानमंत्री आवास योजना यासह स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणीबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. तसेच ई गर्व्हन्स प्रकल्पही प्राधान्याने राविण्यार असल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी जिल्हा परिषद अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सर्व केंद्रीय योजनांना तातडीने पूर्ण करत पाणी पुरवठा आणि कृषीविषयक सुविधा जनतेला उपलब्ध करुन दिल्या जातील, असे सांगितले.

यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह आमदार श्री. बागडे, आ. श्री. सावे, आ. श्री. बंब,आ.श्री. राजपुत  यांनी प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सडक योजना तसेच राष्ट्रीय महामार्ग योजनेची जिल्हयातील रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची होण्यासाठी गुणवत्तापूर्ण काम न करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याबाबत सूचना केली. खासदार श्री. डॉ. कराड यांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थीना घरे लवकर उपलब्ध झाली पाहिजे, असे सांगितले. आमदार प्रशांत बंब यांनी नांदूर-मध्यवेश्वर कालवा प्रकल्प राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार होत नसून  वेळेत पूर्ण न होणे याबाबत प्रश्न उपस्थित करीत समितीने या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार श्री. बागडे यांनी रस्त्यांच्या कामांबाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला एकावेळी किती कामे भेटावी याबाबत नियम आखण्याची मागणी केली. तसेच पंतप्रधान योजनेतील लाभार्थ्यांना लवकर घरे मिळावी, स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या कचऱ्याचे खतात रुपांतर करण्याची प्रक्रिया प्रकल्प चालवणे, उज्वला योजनेंतर्गत जोडण्या जनतेला मागणीप्रमाणे आपल्या सर्कलमध्ये मिळण्याबाबत सूचना केली. श्री. सावे यांनी राष्ट्रीय महामार्गाची कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण, दर्जेदार होण्याबाबत तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत डपिंग ग्राऊंड येथील कार्यप्रक्रियेकडे लक्ष देण्याची सुचना केली. तसेच शहर पाणी पुरवठा योजना मंजूर असुन कामे लवकर  सुरु करण्याची मागणी केली. आ. श्री. बोरनारे यांनीही जिल्ह्यांतर्गत रस्त्यांच्या खराब दर्जामुळे अपघातात वाढ होत असल्याने समितीने प्रत्यक्ष पाहणी करुन रस्ते दुरुस्ती तातडीने करण्याची सुचना केली तसेच प्रलंबित तातडीने पूर्ण होण्याबाबत सूचीत केले.

यावेळी कृषी सिंचन, उज्वला गॅस, प्रमोद महाजन कौशल्य विकास, पाणीपुरवठा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, नगरपालिकांतर्गत पाणीपुरवठा, जलजीवन मिशन कृती केंद्रीय योजना तसेच ग्रामपंचायत निहाय टेलीकॉम योजनेंतर्गत ब्राँडबँड सुविधा उपलब्ध होण्याबाबतच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढवा घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष आणि पंचायत सिमती सदस्याच्या सुचना ऐकुन घेत त्यावर कारवाई करण्याचे निर्देशही श्री. दानवे यांनी यावेळी दिले.

जिल्ह्याच्या व्यापक विकासासाठी केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी