बंद

जिल्ह्याचा मृत्यूदर शून्यावर येण्यासाठी प्रयत्नात वाढ करावी -पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशन दिनांक : 02/11/2020

  • कोरोनातून बरे झालेल्यांसाठी आरोग्य सुविधांचे नियोजन करावे
  • जनजागृती आणि चाचण्यांचे प्रमाण वाढवावे.

औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) :  जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.72 टक्के  इतके झाले आहे,  ही निश्चितच समाधानाची बाब असून याच पध्दतीने जिल्ह्याचा मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठीच्या प्रयत्नात वाढ करावी, तसेच कोरोनातून बरे झालेल्यांसाठी प्राधान्याने आरोग्य सुविधांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी  डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, अन्न व औषध प्रशासनाचे एम.काळकेश्वरकर तसेच इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.  

यावेळी  पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना रुग्णासांठी पुरेशा प्रमाणात उपचार सुविधा, औषध साठा, अत्यावश्यक सुविधा, जिल्ह्यात उपलब्ध आहेत. सर्व कोरोना योद्धयांच्या अहोरात्र मेहनतीमुळे जिल्ह्यातील कारोना संसर्ग रोखण्यात यंत्रणांना यश मिळत असून त्यासोबतच आता मृत्यूदर शून्यावर आणण्याचे आपले ध्येय गाठण्यासाठी चाचण्याचे प्रमाण आणि जनतेने घ्यावयाची  खबरदारी या दोन गोष्टी वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सातत्याने सर्व यंत्रणांनी काम सुरु ठेवावे. तसेच आता कोरोनातून बरे झालेल्यासाठी पोस्ट कोविड अंतर्गत निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्याबाबत योग्य त्या उपचार सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. त्याद्ष्टीने   यंत्रणानी तत्परतेने आरोग्य सुविधांचे परिपूर्ण नियोजन करावे. त्यासाठीची नियमावली, घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करावे  , असे निर्देशित करुन पालकमंत्री यांनी जगभरात  डिसेंबर महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून चीन, युरोपमध्ये पुन्हा लॉकडॉऊन जाहिर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोक्याची परिस्थीती लक्षात घेऊन सर्व प्रकारची तयारी यंत्रणांनी ठेवावी , असे श्री. देसाई यांनी सांगितले.

 तसेच सर्वाच्या दक्षतेमुळे आणि आरोग्य यंत्रणांच्या सहकार्याने या आरोग्य आपत्तीला आपण यशस्वी सामोर जात आहोत यामध्ये नागरिकांची सतर्कता हा घटक अधिक प्रभावी ठरणार आहे. त्यासाठी येत्या काळात प्रत्येकाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’या मोहिमेत सक्रीय सहभागी होत आपली आणि कुटुंबाची आरोग्य सुरक्षा जपणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ही मोहिम उपयुक्त ठरत असून मोहिमेचा दुसरा टप्पा ही यशस्वीरित्या राबवावा. आरोग्य बाबतची सतर्कता वाढवण्यासाठी जनजागृती करावी. परिस्थीती नियंत्रणात असली तरी ती कायमस्वरुपी चांगली होण्यासाठी सर्वानी सतर्कता  बाळगावी, असे आवाहन श्री. देसाई यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांनी  जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा वाढत असून मृत्यूदर शून्यावर आणण्याच्या दृष्टीने रुग्णांचे वेळेत निदान होण्यावर लक्ष देण्यात येत आहे त्यासाठी चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या सर्वेक्षणातून नागरिकांची आरोग्य विषयक माहिती प्राप्त होत असून कोरोना संसर्ग तसेच इतर आजारापासून वेळीच बचाव करणे यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणारी आहे. आतापर्यंत या सर्वेक्षणातून प्राप्त माहितीच्या आधारे पहिल्या फेरीतील प्राप्त माहितीच्या आधारे 87  हजार 980 तर दुसऱ्या फेरीतील 63 हजार 592  रुग्ण उपचारासाठी  संदर्भित करण्यात आलेले आहे.  तसेच केंद्र सरकारच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील आरोग्य सेवकांच्या कोरोना लसीकरणांसाठी माहिती संकलन प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे  श्री. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कुलकर्णी आणि मनपा आरोग्य अधिकारी. डॉ.पाडळकर यांनी कोरोना रुग्णांची सध्यस्थिती आणि कोरोनातून बरे झाल्यानंतरची स्थिती हाताळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायोजनांची माहिती दिली.

घाटीमध्ये कोरोनातून बरे झालेल्यासांठी बाह्य रुग्‍ण विभाग (पोस्ट कोविड ओपीडी )सुरू असून स्वतंत्र वार्ड कार्यान्वित आहे. त्याव्दारे पोस्ट कोविड व्यक्तींच्या व्यवस्थापनावर लक्ष देण्यात येत आहे.घाटीमध्ये मंजूर झालेल्या महिला व बाल संगोपन रुग्णालय सुरू होण्याच्या द्ष्टीने शासनस्तरावरुन परवानगी मिळावी .तसेच घाटीतील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी डॉ.येळीकर यांनी मागणी केली.

जिल्हा रुग्णालयात  1 नोव्हेंबरपासून कोरोनातून बरे झालेल्यासाठी  बाह्य रुग्‍ण विभाग( पोस्ट कोविड ओपीडी)सुरु होणार असून भविष्यातील कोविड लसीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील शासकीय तसेच नोंदणीकृत खासगी आरोग्य यंत्रणामधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलन सुरु असून डेटाबेसचे काम लवकरच पुर्ण होणार असल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ.पाडळकर यांनी शहरात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरु असून रोज हजार ते बाराशे चाचण्या करण्यात येत असून पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील रुग्णांसाठी  100 रेमेडिसीवीर इंजेक्शन आरोग्य यंत्रणेस यावेळी दिली.

जिल्ह्याचा मृत्यूदर शून्यावर येण्यासाठी प्रयत्नात वाढ करावी -पालकमंत्री सुभाष देसाई