जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जीवरक्षक बोटीचे लोकार्पण
प्रकाशन दिनांक : 20/10/2021
औरंगाबाद, दि.20, (जिमाका) :- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जीवरक्षक बोटीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महानगर पालिका प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजेय चौधरी, महानगर पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर.के.सुरे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत जिल्ह्याकडे इन्ल्फो टेबल बोट औरंगाबाद-06, गंगापूर-02, वैजापूर-01 अशा 09 बोटी उपलब्ध आहेत. तर नव्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून 02 बोटी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारे औरंगाबाद जिल्ह्याकडे सर्व बोटी या सुस्थितीत आहेत. जिल्ह्याकडे एकूण बोटींची संख्या आता 11 झालेली आहे. आपत्ती काळात या सर्व बोटींचा वापर करण्यात येणार असून जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन बळकटीकरण होऊन अधिक सक्षमपणे शोध व बचाव कार्यात मदत होणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नुकत्याच 2 इन्फ्लो टेबल बोटी प्राप्त झाल्या आहेत. सदर बोटीची अंदाजे किंमत रु.10 लक्ष आहे. सदर बोटी ह्या मोटारीसह आहेत व त्याला यामाहा कंपनीने 35 एचपीचे इंजिन जोडलेली आहेत. एका बोटीमध्ये एकाचवेळी 6 जवान प्रवास करुन 6 जणांना सोडवून आणू शकतात. अशा प्रकारे एका बोटीतून 12 जण प्रवास करु शकतात. सदर बोट ही मोठ्या नदीच्या प्रवाहातून सहज अंतर कापू शकते अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
