बंद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या द्वारा एमजीएम रुग्णालयातील कोरोना उपचार सुविधांची पाहणी

प्रकाशन दिनांक : 25/09/2020

औरंगाबाद,दि.२५(जिमाका)- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एमजीएम  रुग्णालयालयास  दि.24 रोजी  भेट देऊन रुग्णालयातील  कोरोना उपचार सुविधांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

 जिल्ह्याचे पालकमंत्री  सुभाष देसाई व लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील कोवीड बेडची संख्या वाढवण्याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील रुग्णालयांना कोवीड बेडची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले होते.

             त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दहा दिवसांपूर्वी  एमजीएम  प्रशासनाला  पूर्वीचे ३०० बेड यामध्ये आणखी २५० एवढे बेड संख्या वाढवुन ५५० बेड संख्या करा असे निर्देश दिल्यानंतर  जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एमजीएम  रुग्णालयाने बेडची संख्या ३०० वरुन ५१६ एवढी केली होती. मात्र यामध्ये आणखी ३४ बेड वाढवण्याचे आदेश त्यांनी या प्रसंगी एमजीएम  रुग्णालय प्रशासनास दिले.

          या पाहणी वेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी कोवीड ICU, कोवीड ओ.पी.डी. कोवीड लॅब, एक्सरे,सोनोग्राफी, सिटीस्कँन, लिक्वीड ऑक्सीजन प्लान्ट या विभागास भेट देऊन पहाणी केली. ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल विचारणा करत घाटी रुग्णालयास एमजीएमने ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केल्याबद्दल एमजीएम रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले.

         कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जात असलेल्या महिला हिराबाई चौधरी वय ५६ यांची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन रुग्णालयातील व्यवस्था,बिल,स्वच्छता इत्यादींबाबत विचारणा केली.

या प्रसंगी एमजीएमचे सीईओ  डॉ.प्रवीण सूर्यवंशी , डीन डॉ. राजेंद्र बोरा,आयसीयुचे प्रमुख डॉ.निकाळजे,डॉ.राघवन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ.शिवाजी भोसले, नायब तहसीलदार मुंडे इ. उपस्थित होते.