बंद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत अतिक्रमण जमीनदोस्त

प्रकाशन दिनांक : 01/06/2021

*हिमायत बाग फळ संशोधन केंद्राच्या जागेवर होते अतिक्रमण

*हर्सुल शहरातील अतिक्रमणाचीही केली पाहणी

औरंगाबाद, दिनांक 31 (जिमाका) : हिमायत बाग फळ संशोधन केंद्राच्या आरेफ कॉलनी येथील जागेवरील अतिक्रमण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत आज जमीनदोस्त करण्यात आले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आज जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांची भेट घेऊन हिमायत बाग फळ संशोधन केंद्राच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत माहिती दिली. तसेच फळबाग संशोधन केंद्राच्यावतीने अतिक्रमणाचा तपशील मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आला. या पत्राची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष घटना स्थळाची पाहणी केली. तसेच या जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्याच्या व आवश्यकती कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. अतिक्रमण हटाव पथकाने तत्काळ कार्यवाही करत फळबाग संशोधन केंद्राच्या जागेत उभारण्यात आलेले अतिक्रमण लागलीच हटवण्यात आले.

यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, रवींद्र निकम, अपर्णा थेटे आदींची उपस्थिती होती.

हर्सुल शहरातील अतिक्रमणासही दिली भेट

औरंगाबाद-अजिंठा राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात अडसर ठरत असलेल्या विविध अतिक्रमित केलेल्या जागांची पाहणीही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण आणि मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी संयुक्तरित्या केली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, कार्यकारी अभियंता मोहन सावंगीकर आणि उपअभियंता अभिजित गोडेकर यांनी अतिक्रमण करण्यात आलेल्या जागांची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली. त्यांनी यावेळी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलेल्या जागांवर नियमानुसार तत्काळ कारवाई करून अतिक्रमण हटविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.