बंद

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण

प्रकाशन दिनांक : 24/06/2021

औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका) : जनसहयोग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वटसावित्री पोर्णिमा निमित्त वटवृक्षांच्या (वडाच्या) रोपांची लागवड उपक्रमातंर्गत आज जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते वटवृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगाव येथील परिसरात जनसहयोग संस्थेच्या सदस्यांमार्फत जवळपास दोनशे एकवीस (221) वटवृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी जनसहयोग संस्थेचे संस्थापक प्रशांत गिरी तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.

वृक्षारोपण प्रसंगी श्री. चव्हाण म्हणाले, कोरोना संसर्गाच्या काळात ऑक्सिजन महत्त्वाचा असल्याने वटवृक्षांच्या माध्यमातून अधिकाधिक आक्सिजन निर्माण होऊन पर्यावरणाचे संतूलन राखणे आवश्यक आहे. जैवविविधता टिकवून ठेवणाऱ्या देशी प्रजातींच्या झाडांची लागवड व संवर्धन काळाची गरज आहे, असे सांगत श्री.चव्हाण यांनी वटपोर्णिमा निमित्त वटवृक्ष (वडाच्या) रोपांची लागवड करणाऱ्या महिलांचे कौतुक केले.

या परिसरात जनसेवा संस्थेमार्फत जवळपास 25 एकरावर 15 हजार झाडे लावून जगविण्यात आले आहेत. आणखी 4 हजार झाडे लावणार असल्याबाबत या संस्थेचे कौतूक करत झाडे लावण्यात आलेल्या संपूर्ण परिसरास तारेच्या कुंपनाव्दारे संरक्षण देणार असल्याचे श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण