बंद

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ‘प्रतिसाद कक्षाचे’ उद्घाटन

प्रकाशन दिनांक : 26/08/2020

औरंगाबाद दिनांक 25: औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून कामकाज करीत आहे अशा सर्व अधिकारी, कर्मचारी यांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्यास त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिसाद कक्षाचे’ उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी  अनमोल सागर, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी  आप्पासाहेब शिंदे, भारत कदम, रिता मैत्रेवार, महादेव किरवले, वर्षाराणी भोसले, संगीता चव्हाण, संगीता सानप, तहसीलदार कृष्णा कानगुले, अपर तहसीलदार किशोर देशमुख, नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की मी जिल्हाधिकारी  आपला एक कुटुंब प्रमुख म्हणून,  आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तत्पर असून जिल्हा प्रशासनाचा ‘प्रतिसाद’ हा उपक्रम सुरू करण्‍यात येत आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करत असताना अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य यांना संसर्ग झाल्यास तात्काळ आवश्यक मदत मिळणे गरजेचे आहे. या अनुषंगाने भारतातील लष्करामध्ये जखमी सैनिकांबाबत ज्याप्रमाणे वैद्यकीय सुविधांचा प्रोटोकॉल आहे, त्याच धरतीवर ‘कोरोना योद्धा’ व त्यांच्या परिवारास तात्काळ आवश्यक ती मदत करून त्यांचे आत्मबल वाढावे व या संसर्गाच्या अनुषंगाने कामकाज करतांना त्यांच्या  सोबत जिल्हा प्रशासन आहे, अशी त्यांच्यामध्ये भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ‘कोरोना योद्धा’ तसेच त्यांच्या परिवारास तात्काळ मदतीसाठी प्रतिसाद कक्षाची स्थापना करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले.

      यावेळी कोरोना संसर्ग झालेल्या  शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्थापन  करण्यात आलेल्या ‘प्रतिसाद कक्षाचे’ सनियंत्रक  जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले (भ्रमणध्वनी क्रमांक-8888844454)  तसेच  प्रतिसाद कक्षाचे सहाय्य नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर (भ्रमणध्वनी क्रमांक-9130092121) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 'प्रतिसाद कक्षाचे' उद्घाटन