बंद

जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा क्रिडा सुंकुलाच्या जागेची पाहणी

प्रकाशन दिनांक : 02/02/2021

  • अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे निर्देश

औरंगाबाद,दिनांक.2(जिमाका): मौजे चिकलठाणा येथे उभारण्यात येत असलेल्या जिल्हा क्रिडा संकुलाचे काम लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संकुलाच्या जागेची पाहणी केली . यावेळी संकुलाच्या जागेची सीमा निश्चित करुन अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना नोटीस देत अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे निर्देश  श्री. चव्हाण यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा क्रिडा संकुल समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे, पोलीस उपअधीक्षक, डॉ. विशाल नेहुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, तहसीलदार एस,एन लाड, क्रिडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, तलाठी विशाल मगरे तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते .

चिकलठाणा येथील गट क्रमांक 216 व 217 मधील एकत्रित 14.96 हेक्टर म्हणजेच जवळपास 37 एकर गायरान जमीनीवर उभारण्यात येत असलेल्या या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या नैसर्गिक जलस्त्रोताचा संकुल उभारण्यात उपयोग करावा. त्याच बरोबर हे संकुल सर्व सोईसुविधायुक्त परिपुर्ण आणि उत्कृष्ट दर्जाचे व्हावे. यादृष्टीने योग्य  ती कार्यवाही  करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधितांना केल्या.

जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा क्रिडा सुंकुलाच्या जागेची पाहणी