जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
प्रकाशन दिनांक : 14/05/2021
औरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका) :- महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारसकर, लेखाधिकारी शीतल महाले यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्य व सामाजिक कार्यावर आधारित जीवनपट ध्वनीफितीच्या माध्यमातून उपस्थितांना ऐकविण्यात आला.
अभिवादनानंतर कोमल औताडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देऊन जातीभेद आणि धर्मांधता नष्ट करण्याबरोबरच स्त्री शिक्षण आणि समानता या विषयात त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. जीवनात कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्परता याच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती होते यासाठी प्रामाणिक कार्य करत राहावे ही शिकवण महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यातून मिळाते.
शासनस्तरावरुन महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून 26 एप्रिल 2001 ला पहिल्यांदा शासकीय जयंती साजरी करण्यास राज्यात सुरूवात झाली. महाराष्ट्र राज्याचा आदर्श घेत राज्याच्या शेजारील कर्नाटक राज्यात 2002, तेलंगणामध्ये 2003 तर आंध्र प्रदेशामध्ये 2016 मध्ये शासकीय जयंती साजरी करण्याची सुरूवात झाली असून महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक, धार्मिक कार्याचा गौरव करण्यात येत आहे.
