बंद

जिल्हाधिकारी कार्यालयात होणार संशयित अभ्यागतांची अँटिजेन कोरोना चाचणी

प्रकाशन दिनांक : 25/02/2021

औरंगाबाद, दिनांक.24 (जिमाका): जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन कामकाजनिमित्‍त येणा-या नागरिक/अभ्‍यागतांकरिता कार्यालयात भेटी पूर्वी कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शरीरातील ऑक्सीजन व तापमानाची तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये जर कुणी अभ्यागत कोरोना संसर्ग संशयित आढळून आले तर त्यांची कोरोना रॅपिड अॅन्‍टीजेन टेस्‍ट (RAT) प्रवेशव्‍दारावर करणे अनिवार्य करण्‍यात आले आहे.

सध्‍यस्थितीत कोरोनाचा पुन:श्‍च प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा भाग म्‍हणून ही चाचणी जिल्‍हाधिकारी कार्यालयात ये जा करणा-या कोरोना संसर्ग संशयित अभ्यागतांसाठी अनिवार्य करण्‍यात आली आहे.

सदर चाचणी करण्‍यासाठी आरोग्‍य विभागाचे पथक कार्यरत करण्‍यात आले आहे. या प्रक्रियेची सुरुवात प्रभारी जिल्‍हाधिकारी डॉ अनंत गव्‍हाणे यांनी स्‍वत: ही चाचणी करुन घेतली आहे. सदरील चाचणी करुन  घेण्याबाबत  सहकार्य करावे व उपस्थित वैद्यकीय पथकांनी दिलेल्‍या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे जिल्‍हा प्रशासनातर्फे आवाहन करण्‍यात आले आहे.