बंद

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

प्रकाशन दिनांक : 24/09/2020

औरंगाबाद,दि. 24 (जिमाका) ‍–भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी कळविले आहे.

सदर कार्यक्रमांतर्गत पुर्व पुनरिक्षण उपक्रम दि. 30 सप्टेंबर ते  दि. 31 आक्टोबर,2020 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येईल. तसेच दुबार /समान  नोंदी  व छायाचित्र मतदार ओळखपत्र संदर्भातील त्रुटी दुर करण्यात येतील. तसेच विभाग/भाग पुन्हा तयार करणे आणि मतदानाच्या क्षेत्राच्या/भागांच्या सीमेच्या पुनर्रचनेचे प्रस्ताव अंतिम  करणे आणि मतदान केंद्राची यादी मंजूर करण्यात येईल. दि. 1 नोव्हेंबर ते दि. 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत नमुना 1 ते 8 तयार करण्यात येईल. तसेच पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप यादी तयार करण्यात येईल.

पुनरिक्षण उपक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. दावे व हरकती दि. 16 नोव्हेंबर ते दि. 15 डिसेंबर 2020 या कालावधीत स्विकारण्यात येतील. विशेष मोहिमांचा कालावधी हा दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत, मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार राहील.दावे व हरकती दि. 5 जानेवारी 2021 पर्यंत  निकालात काढण्यात येतील.

दि. 14 जानेवारी 2021 पर्यंत प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करण्यात येईल आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेण्यात येईल. तसेच डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येईल. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि. 15 जानेवारी 2021 रोजी केली जाईल.

सदर पुनरिक्षण कार्यक्रम हा दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम असेल. सदर कार्यक्रम वरील वेळापत्रकानुसार व मतदारयादी नियम पुस्तिका 2016 मधील तरतुदीनुसार तसेच त्यानंतर त्यासंदर्भात देण्यात आलेल्या विविध सुचनांच्या अनुषंगाने राबवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे.