बंद

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 20/02/2022

औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण कार्यात समाजातील सर्व जाती- धर्मातील लोकांना सोबत घेवून कार्य केले. त्यांच्यातील युध्दकौशल्य, गुणग्राहकता, कामकाजातील समन्वय, शुद्ध हेतूने व आत्मीयतेने रयतेसाठी केलेले कार्य प्रत्येकाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयात सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांच्यासह प्रमूख वक्ते म्हणून विजय गवळी, विंग कमांडर श्री. जाधव व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रात काम करताना संघभावनाने, सर्वांना सोबत घेवून काम केल्याने यशस्वी होता येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सर्व जातीधर्माच्या लोकांचा सहभाग असल्याने ते रयतेचे राजे आहेत. मातृत्वाचा आदर, इतर धर्माचा सन्मान तसेच लहान थोर सर्वांचा सन्मान  त्यांच्या कार्यातून केल्याने   जीवाला जीव देणारे माणसं निर्माण झाली व यातून स्वराज्य निर्माण झाले, अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा पट उलगडला.  दैनंदिन कामकाजात महाराजांचे विचार उपयोगी पडत असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

शिवजयंतीच्या कार्यक्रमात प्रमूख वक्ते विजय गवळी यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी सांगितले की, आपआपल्या क्षेत्रात उच्च गुणवत्ता मिळवणे म्हणजे ‘शिवाजी’ होणे असे आहे. याचबरोबर शेतकरी यांच्याविषयी असलेल्या आत्मीयता, मातृत्वाचा सन्मान याबरोबरच संत तुकाराम व शिवाजी महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी व  आप आपल्या जीवनात यशस्वी व्हावे, असे सांगितले.

या कार्यक्रमात गार्गी महाले या विद्यार्थीनीने शिवाजी महाराज यांच्यविषयी विचार मांडले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायक