बंद

घरकुलाअभावी पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 23/07/2021

औरंगाबाद, दि. 22 (जिमाका) – ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येतात. तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांनी समन्वयाने प्राप्त प्रस्ताव लवकरात लवकर मंजुर करावे जेणेकरुन जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी घरकुलाअभावी वंचित राहु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण घरकुल योजनेबाबत आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, प्रकल्प अधिकारी संगीता पाटील सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे 2022 या कार्यक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येते. जिल्ह्यात अनेक गृहनिर्माण योजनांतर्गत जास्तीत जास्त घरकुलांचे वाटप करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत एकही प्रस्ताव प्रलंबित राहता कामा नये. जागेच्या मोजणीसाठी नगररचना विभाग जे शुल्क लावते ते माफ करण्यात येणार असल्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाले की, जे गृहनिर्माण प्रकल्प मंजुर झाले आहेत परंतु काम सुरू झालेले नाही अशा प्रकल्पांचे काम तातडीने सुरू करावे. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी तहसिल तसेच पंचायत समिती कार्यालयातील कॅन्टीनचे काम तालुक्यातील उत्कृष्ट बचत गटांना देण्याची प्रक्रीया सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

यावेळी उपस्थित सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील गृहनिर्माण प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादरीकरणाव्दारे दिली.

घरकुलाअभावी पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये