बंद

ग्राहकांनी खरेदी करताना अधिक जागृत राहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण · जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

प्रकाशन दिनांक : 26/12/2020

औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका) : ग्राहकांनी बाजारातून खरेदी करताना अधिक सजग व जागृत राहून खरेदी केलेल्या वस्तूचे पक्के देयक दुकानदारांकडून घ्यावे, तो त्यांचा अधिकार आहे. या जबाबदारीची जाणीव ठेऊन ग्राहकाने राष्ट्र निर्माणात योगदान द्यावे, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभाग्रहात वेबिनारव्दारे राष्ट्रीय ग्राहक दिन श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती स्मीता कुलकर्णी, ग्राहक तक्रार आयोगाचे सदस्य किरण ठोले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर, तहसीलदार डॉ. शंकर लाड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. प्रत्येक ग्राहकाने या कायद्याचा व्यवहारात वापर करायला हवा. यामुळे ग्राहकांचे हित अबाधित राहण्यास मदत होते. ग्राहकांनी आपली जबाबदारी ओळखून या कायद्याबाबत जनसामान्यात जनजागृती निर्माण करावी, अशी अपेक्षाही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.

श्री. ठोले यांनी जुन्या ग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा होणे आवश्यक होते. त्या सुधारणा नवीन कायद्यात झाल्याने ग्राहकांचे हित जोपासले जाईल, असे मत मांडले. श्रीमती कुलकर्णी यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे जुन्या कायद्याच्या तुलनेत नवीन कायदा हा सर्वसमावेशक आहे. काळाची गरज ओळखून त्यात बदल करण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडे आता 1 कोटी रक्कमेपर्यंतची तक्रार दाखल करणे शक्य झाले आहे. पूर्वीची मर्यादा 20 लाख एवढीच होती. त्याचबरोबर ग्राहकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे सुनावणीस हजर राहता येणार आहे. ग्राहक जेथे राहतो किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणाहून देखील तक्रार दाखल करता येणे शक्य झाले आहे. या कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताचे संरक्षण होईल. या संरक्षणासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. प्राधिकरण स्वत:हून ग्राहकाच्या हितास बाधा पोहचविणाऱ्या विरूद्ध कारवाई करू शकेल,  आदी बाबींबाबत  सवस्तिर माहिती श्रीमती कुलकर्णी यांनी दिली.

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे म्हणाले, आजच्या राष्ट्रीय ग्राहक दिनी हा नवीन कायदा सर्वांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ग्राहकांनी त्यांच्या हक्काबाबत अधिक जागृत राहून बाजारातून खरेदी करावी, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. भारस्कर यांनी केले. आभार अशोक दराडे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा पुरवठा कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

ग्राहकांनी खरेदी करताना अधिक जागृत राहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण · जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा