बंद

ग्राहकांच्या हक्कांचे संवर्धन करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 16/10/2020

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) :  ग्राहक हक्कांचे संवर्धन व संरक्षण करणे, ग्राहक संरक्षण परिषद समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार परिषद समितीने ग्राहक हिताच्या दृष्टीकोनातून कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज समिती सदस्यांना केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हा भाववाढ सनियंत्रण समिती आणि जिल्हा दक्षता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, समितीचे अशासकीय सदस्य प्रदीप सोळुंके, नानक वेदी, रावसाहेब नाडे, राजेश मेहता, साबेर शेख, प्रफुल्ल मालानी, संगीता धारूरकर, अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, सहायक पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर, सहायक पोलिस आयुक्त अशोक बनकर, अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. अजिंठेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती,  वैध मापन शाखेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी अनुक्रमे तिन्ही समितीच्या बैठकीत प्रत्येक सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले व संबंधित विषयावर कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असे सांगितले. ग्राहक परिषद समितीच्या सदस्यांनी रस्ते, खड्डे, स्वस्त धान्य दुकान, इंग्रजी शाळांकडून घेण्यात येत असलेले शुल्क आदी समस्यांबाबत जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांना सविस्तर माहिती दिली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे सांगतानाच ग्राहकांना ग्राहकांच्या हक्काची जाणीव करून द्या, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शेळके यांनी सणासुदीच्या काळात स्वस्त धान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी देखील दिव्यांगानाही मुबलकप्रमाणात धान्य पुरवठा होईल, याबाबत विचार करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सांगितले.

बैठकीचे प्रास्ताविक सहायक पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी केले व शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

ग्राहकांच्या हक्कांचे संवर्धन करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण