बंद

ग्रामीण रुग्णालयांनी उपचार सुविधांसह सज्ज राहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 29/03/2021

  • तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सक्रियतेने चाचण्या वाढवाव्यात.
  • लॉकडाऊनमध्ये मुख्य निरीक्षक, सुपरवायझर, नोडल ऑफिसर यांची नेमणूक करावी.
  • ग्रामीण भागातील सर्व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह खाटांची संख्या वाढवावी.

औरंगाबाद, दि.28, (जिमाका) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेला कोरोना संसर्ग वेळीच रोखण्यासाठी कोरोना चाचण्या आणि वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटरच्या सुविधा तसेच ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह खाटांची संख्या तातडीने वाढविण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊनची अंमलबजावणी व ग्रामीण भागातील सेरो सर्वेक्षणा बाबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्हीसीद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, सर्व उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, महानगर पालिकेचे अतिरिक्त्‍ आयुक्त्‍ बी.बी.नेमाणे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री रिता मैत्रेवार, आप्पासाहेब शिंदे, संगिता सानप, मंदार वैद्य, संगिता चव्हाण आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, ग्रामीण भागात विशेषत: आठवडी बाजार भरणाऱ्या गावांमध्ये लसीकरणावर अधिक भर द्यावा. यामध्ये पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांची मदत घेऊन लोकांपर्यत संपर्क करत विश्वासाचे वातावरण निर्माण करुन गावांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच 25 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावातील सर्वांच्याच तातडीने चाचण्या कराव्यात. संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. सर्व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी गावागावात जाऊन सर्वांचा चाचण्या तातडीने करुन घ्याव्यात. प्रतिदिवशी 100 चाचण्या करण्याच्या दृष्टीने सक्रिय व्हावे. संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेची अधिक व्यापक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने लसीकरण पथक, जनजागृती पथक, मुख्य निरीक्षक, लॉक डाऊन निरीक्षक नेमावे ही जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांची राहील असे निर्देशीत करुन जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंट्रोल रुम, लॉकडाऊन सुपरवायझर, निरीक्षकांच्या ऑर्डर काढाव्यात. तसेच गरजूना एनजीओंच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करुन द्यावे. तसेच शिवभोजन थाळीची देखील संख्या वाढविण्यात यावी. लॉकडाऊनच्या काळात गरजूनां तात्काळ औषधोपचारांची मदत मिळावी यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून या काळात जनतेला आवश्यक गोष्टींसाठी त्रास होणार नाही याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावयाची आहे. आवश्यकता असेल त्या ग्रामीण भागात संबंधितांनी रोज भेटी द्याव्यात. या ठिकाणी लग्नसंमारंभ मोठ्या प्रमाणात होत नाही ना ? याकडे सरपंच, ग्रामसेवक यांनी लक्ष ठेवावे. जर येथे नियमांचे उल्ल्ंघन होत असेल तर वेळप्रसंगी गुन्हेदेखील दाखल करण्याच्या सूचना देऊन सारीच्या सर्वेक्षणामध्ये जे शिक्षक टाळाटाळ करतील, अथवा गलथान कारभार करतील त्यांचे वेतन रोखण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना यावेळी दिले.

यावेळी व्ही.सी.च्या माध्यमातून संवाद साधतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले म्हणाले की, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आता दररोज लसीकरण करण्यात येत आहे. परंतु अजूनही काही भागात लसीकरणाचा वेग मंद असून येथील सरपंच, ग्रामसेवक यांनी लोकांना लसीकरणासाठी केंद्रांवर आणावे. तसेच स्वॅब टेस्टिंगची वेळ ही मर्यादित ठेवू नये, अशा सूचना केल्या.

ग्रामीण रुग्णालयांनी उपचार सुविधांसह सज्ज राहावे