बंद

ग्रामीण भागात चाचण्या आणि कोविड केअर सेंटर तातडीने वाढवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 22/03/2021

  • ग्रामीणमध्ये खासगी रूग्णालये सीसीसीसाठी वापरावेत.
  • तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सक्रीयतेने चाचण्या वाढवाव्यात.
  • ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालये मनुष्यबळ, उपचार सुविधांसह सज्ज ठेवावे.
  • रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या बाबतीत तज्ज्ञ समिती मार्फत तपासणी  होऊन त्यांच्या वेळेत डिस्चार्ज बाबत निर्णय होणार.
  • खाजगी रुग्णालयांना CCC चा दर्जा देणार.

औरंगाबाद,दि.22 (जिमाका) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसांत वाढत असलेला कोरोना संसर्ग वेळीच रोखण्यासाठी त्या ठिकाणी कोरोना चाचण्या आणि वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटरच्या सुविधा तातडीने वाढविण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यंत्रणांना निर्देशित केले, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, यांच्यासह अन्न औषध प्रशासन, आरोग्य, महसूल, नगरपालिका, पोलीस, कृषी, सहकार यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातील रूग्णांना त्याच ठिकाणी योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कोविड केअर सेंटर्स वाढवावेत. रूग्ण दाखल करण्यासाठीच्या नियमावलीचे कटाक्षाने पालन करत लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असलेल्या बाधीतांना सीसीसीमध्ये उपचार उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून अधिक त्रास आणि उपचारांची गरज असलेल्या रूग्णांसाठी खाटा उपलब्ध राहतील. सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकांची आवश्यकता आणि उपलब्धता याबद्दल तातडीने माहिती सादर करावी. जेणेकरून नवीन वाढीव सीसीसीसाठी त्या पुरेशा प्रमाणात तयार ठेवता येतील, असे निर्देशित करून श्री. चव्हाण यांनी चाचण्यांमध्ये वाढ करत असतांना 25 पेक्षा जास्त रूग्ण आढळलेल्या गावांतील सर्वांच्याच तातडीने चाचण्या कराव्यात. संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावेत. गंगापूर, वैजापूर, सिल्लोड उपजिल्हा रूग्णालयातील तसेच सर्व ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांनी गावा-गावात जाऊन सर्वांच्या चाचण्या तातडीने करून घ्याव्यात. यामध्ये स्वत:हुन लोकांपर्यंत संपर्क करत विश्वासाचे वातावरण निर्माण करून गावांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासाठी जिल्हा परिषद तसेच महसूल यंत्रणांची मदत घेऊन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देशित करून प्रतिदिवशी 100 चाचण्या करण्याच्या दृष्टीने सक्रीय व्हावे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी वाढीव प्रमाणात सीसीसीची उपलब्धता आणि चाचण्यांचे वाढीव प्रमाण या बाबी नियंत्रीत कराव्यात. सीसीसीसाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने तातडीने भरती करावे. त्याची कार्यवाही लगेच सुरू करावी. संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेची अधिक व्यापक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने लसीकरण पथक, रूग्ण समन्वय पथक, जनजागृती पथक नियुक्त करण्यात येणार असून लोकप्रतिनिधींचेही सहकार्य या मोहीमेत घेण्यात येणार आहे. सर्व संबंधितांनी संसर्ग रोखण्यासाठी युद्ध पातळीवर ग्रामीण भागात चाचण्या आणि उपचार सुविधा वाढवाव्यात, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात औषधसाठा, ऑक्सीजनची मुबलक प्रमाणात उपलब्धता ठेवण्यासाठी सतर्कतेने खबरदारी घेण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले.

मनपा आयुक्त पाण्डेय यांनी वाढीव चाचण्यांसाठी लागणाऱ्या किट महानगरपालिकेकडुन मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातील. उपलब्ध मनुष्यबळ आणि उपचार सुविधांचा पुर्ण क्षमतेने वापर करून वाढता संसर्ग रोखण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले.

डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयांमार्फत करण्यात येणाऱ्या वाढीव चाचण्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच स्थानिक यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिल्या जाईल, असे सांगितले.

जिल्ह्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर गंभीर रूग्णांसाठी अत्यावश्यक उपचार सुविधांसह खाटा उपलब्ध ठेवण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या दृष्टीने सर्व खासगी रूग्णालये तसेच इतर उपचार सुविधांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रूग्णांची पाहणी करून त्यांची भरती नियमावलीनुसार (रूग्ण दाखल करण्याबाबतच्या SOP प्रमाणे) झालेली आहे का ? याची शहानिशा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी हॉस्पीटलनिहाय नोडल उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बऱ्याचशा रुग्णालयांमध्ये सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, रुग्णालयात खाटा अडवून बसलेले आहेत, अशा स्वरुपाच्या तक्रारी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्या अनषंगाने पुढील निर्णय घेण्यात येत आहे.

आजच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीमध्ये DCH / DCHC मध्ये दाखल असलेल्या रुग्णांबाबत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म अधिकारी व पोलीस अधिकारी यांचे मदतीने पडताळणी करणे, प्रस्तुत रुग्णाची लक्षणे पाहून, त्यास यापुढे रुग्णालयात ठेवायचे किंवा लक्षणे कमी असलयास CCC किंवा Home Isolation याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी CCC मध्ये अधिकच्या खाटा वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालये जी DCHC साठी पात्र ठरलेले नाहीत, त्यांना CCC चा दर्जा देणे बाबत निर्णय घेण्यात आला. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयामध्ये CCC ची संख्या वाढविल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार मिळू शकेल.

ग्रामीण भागात चाचण्या आणि कोविड केअर सेंटर तातडीने वाढवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण