ग्रामिण भागातील रुग्णांवर वेळेत योग्य उपचार होणे महत्वाचे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 01/10/2020
औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) :जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस समाधानकारक वाढ होत असून ग्रामीण भागातील रुग्ण बरे करण्यात त्या रुग्णांना तातडीने त्याच ठिकाणी योग्य उपचार वेळेत मिळणे हा घटक महत्वाचा आहे. त्या दृष्टीने घाटीतील तज्ञांद्वारे ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी यांना देण्यात येणारे हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथील सुक्ष्मजीवशास्त्र व्याख्यान कक्ष येथे ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले ,त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्यासह सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी , डॉक्टर्स उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, जिल्हयातील उपचार सुविधा अधिक बळकट करत रुग्णांना उत्तम उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. रुग्णांना बरे करण्याचे प्रमाण वाढवण्यात डॉक्टरांची भूमिका आणि रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळणे हे घटक महत्वपूर्ण आहे. सध्या ग्रामिण भागातही कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने त्या ठिकाणी तातडीने रुग्णांना योग्य उपचार मिळणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने तेथील ग्रामिण आणि उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी यांना या प्रशिक्षण उपक्रमाद्वारे रुग्णांवर वेळेत तातडीने योग्य उपचार करण्याबाबतचे प्रशिक्षण घाटीतील तज्ञांकडून देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण रुग्ण आणि डॉक्टर दोघांनाही उपयुक्त ठरणारे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा हा उपक्रम आवश्यक ,उपयुक्त आणि स्वागतार्ह असून सर्वानी याचा जास्तीत जास्त उपयोग करत रुग्ण बरे करण्याचे आपले प्रयत्न अधिक संख्येने यशस्वी करावे.सर्व प्रशिक्षणार्थींनी आपले ज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी या प्रशिक्षण सत्रांचा उपयोग करत यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. येळीकर म्हणाल्या, ग्रामिण आणि उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी यांना असे प्रशिक्षण देणारे महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , औरंगाबाद हे प्रथम महाविद्यालय आहे. या प्रशिक्षणामार्फत इतर जिल्हयातून संदर्भीत केलेल्या कोविड रुग्णांना अत्यावस्थेत येण्याची संख्या कमी होवून मृत्यूदर देखील कमी होण्यास मदत होईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद हे डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल म्हणून कार्यरत असल्याने या रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागातून अत्यावस्थ अवस्थेत येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आहे. रुग्ण अत्यावस्थेत जाण्याची वेळ येऊ न देता त्याच्यावर योग्य उपचार तातडीने केल्यास त्याच्या तब्येतीत निश्चितच सुधारणा करणे शक्य होते , त्यासाठी तज्ञांद्वारे आवश्यक गोष्टीं,उपचार पद्धती याबाबतची माहिती ग्रामिण रुग्णांवर उपचार करणा-यां संबंधितांना अवगत असणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने औरंगाबाद जिल्हातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सेस व वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड मध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांमार्फत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ.येळीकर यांनी सांगितले.
सदर प्रशिक्षण चार दिवसांचे असून यामध्ये सहभागी झालेल्या स्टाफ नर्सेस व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी दोन दिवस व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये दोन दिवस वॉर्ड व आसीसीयू मधील प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात औरंगाबाद व जालना जिल्हा तसेच फुलंब्री, सिल्लोड, पिशोर, अजिंठा व पाचोड येथील 20 स्टाफ नर्स व 18 वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. सदर प्रशिक्षणाचे समन्वय अधिकारी डॉ.जगन्नाथ दिक्षीत, प्राध्यापक व विभागप्रमुख, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग, डॉ.शैलजा राव, सहयोगी प्राध्यापक, वार्धक्यशास्त्र विभाग व डॉ.अमोल जोशी, सहयोगी प्राध्यापक, नवजात शिशुशास्त्र विभाग हे आहेत.
