बंद

गावोगावी मास्क वापरासंबंधी जनजागृती करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 28/08/2020

* कोरोना बाबत खुलताबाद, फुलंब्री तालुक्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

* खुलताबाद, फुलंब्री तालुक्यातील कोविड केअर सेंटर (CCC) ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

औरंगाबाद,दि.27 (जिमाका) – ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधा करीता गावकऱ्यांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसुत्रिचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

खुलताबाद, फुलंब्री तालुक्यातील कोविड केअर सेंटर (CCC) आणि तहसिल कार्यालयास भेट देऊन येथील कोरोना सद्य स्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अनमोल सागर, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, खुलताबादचे तहसिलदार राहुल गायकवाड, फुलंब्री तालुक्याचे तहसिलदार शैलेंद्र देशमुख, खुलताबाद  नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत, खुलताबाद तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, वैद्यकीय ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. सुहास जगताप, फुलंब्री तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न भाले आदी उपस्थित होते.

या बैठकींमध्ये जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी कोरोना पार्श्वभूमिवर गावकऱ्यांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे तसेच सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा वापर म्हणजेच कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध होय. असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की,  गावोगावात रिक्षा फिरवून या त्रिसुत्रीबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना दिले. तसेच खुलताबाद, वेरूळ येथील पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते तेव्हा या ठिकाणी पोलीस विभागाने कडक बंदोबस्त ठेवून गर्दी नियंत्रणात आणावी जेणेकरून कोरोना संसर्गाच्या अटकावास मदत होईल. यावेळी बैठकीत विनामास्क असणाऱ्यांना मास्क देऊन मास्क वापराबाबत सज्जड दमदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी  संबंधितांना दिला.

 तसेच खुलताबाद व फुलंब्री तालुक्यातील कोविड केअर सेंटर (CCC) ला भेट देऊन येथील तहसिल कार्यालयांमध्ये आयोजित बैठकीत श्री. चव्हाण म्हणाले की, कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा देऊन आरोग्यवर्धक अशा आहाराचा समावेश करावा व रूग्णांच्या मनोरंजना करीता भजन, गाणी, योगासने इत्यादींचा समावेश करून येथील वातावरण अल्हाददायक करावे, जेणेकरून कोरोना बाधित व्यक्तींचे मानसिक आरोग्य सुधारून लवकर बरे होण्यास मदत होईल. तसेच या संकटाच्या काळात तालुक्यातील सर्व टीम आरोग्यदायी असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व यंत्रणातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वतःसह सर्व नागरिकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.  स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासकीय कार्यालये, कोविड केअर सेंटरमध्ये कराव्यात. शासकीय कार्यालयांत पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, वाफ घेण्यासाठी यंत्रे लावावीत. जागोजागी हात धुण्याची व्यवस्था करावी, कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती  शोधण्यासाठी सर्व यंत्रणांनी अग्रक्रम ठेवावा.  गाव, तालुका पातळीवरील  बाजारांमध्ये  अँटीजन चाचण्या वाढविण्यात याव्यात. यासाठी  सर्व लोकप्रतिनिधी,  खाजगी डॉक्टर्स,  शासकीय डॉक्टर्स,  सर्व यंत्रणांतील अधिकारी, माध्यमकर्मी  यांना विश्वासात घ्यावे. विना मास्क फिरणाऱ्या  नागरिकांवर कारवाई करून त्यांना मास्कचे महत्त्व पटवून द्यावे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले म्हणाले की, सर्व यंत्रणांनी डेटा इंट्री वेळेत करावी, डेटा एन्ट्री वेळेवर न केल्यामुळे शासनाच्या पोर्टलवर दिसणारे आकडे संभ्रमीत करणारे असल्याचे निदर्शनास येते,  त्यामुळे इंट्री करण्यास प्राधान्य असावे. तसेच अँटीजेन तपासणी बरोबरच आरटीपीआर चाचणीवर भर द्यावा. तसेच औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय औषध विक्र करू नये. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे म्हणाले की, पोलीस दलाने  मास्क न वापरणाऱ्या गावकऱ्यांवर केवळ गुन्हा दाखल न करता दंडात्मक कारवाई करावी.  प्रारंभी खुलताबादचे तहसिलदार राहुल गायकवाड यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनव्दारे खुलताबाद तालुक्याची सद्यस्थिती आढावा देतांना म्हणाले की, खुलताबाद तालुक्यात भद्रा मारोती भक्त निवास येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून या ठिकाणी 10 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.  बाजार सावंगी, गदाना आणि वेरूळ येथे एकुण तीन प्राथमिक आरोग्य केंद्र असून आत्तापर्यंत यामध्ये एकुण 1 हजार 733 स्वॅब घेण्यात आले आहे. 294 आरटीपीसीआर चाचणीत 90 रूग्ण पॉझीटिव्ह तर 204 निगेटिव्ह, 1 हजार 452 अँटीजन तपासणीत 54 पॉझीटिव्ह तर 1 हजार 398 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. तर 79 जणांची सेरो सर्वेव्दारे चाचणी घेण्यात आली आहे. खुलताबाद तालुक्यातील रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93.05 टक्के एवढे आहे. फुलंब्री तालुक्यातील उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी कोरोनाबाबत प्रशासन राबवित असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तर तहसिलदार शैलेंद्र देशमुख यांनी तालुक्यातील सद्यस्थितीबाबत माहिती देतांना म्हणाले की, फुलंब्री तालुक्यातील आठवडे बाजारात रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात येणार असून तालुक्यात 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर तीन कंटेनमेंट झोन आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 3 हजार 439 स्वॅब घेण्यात आले आहेत. तालुक्यातील रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 88.05 टक्के एवढे आहे. तर सध्या  कोविड केअर सेंटरमध्ये 18 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गावोगावी मास्क वापरासंबंधी जनजागृती करा