बंद

गावातील प्रत्येकजण ‘कलेक्टर मित्र’ !

प्रकाशन दिनांक : 14/06/2021

  • हिरडपुरीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे मार्गदर्शन
  • प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
  • हिरडपुरीत मोठ्याप्रमाणात वाळू साठा जप्त
  • नाथ मंदिर परिसरातील आस्थापनांवर कारवाई

औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका) : पैठण तालुक्यातील हिरडपुरीतून वाळू चोरी संबंधात अनेक तक्रारी प्राप्त आहेत. यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. मात्र, या कामात ग्रामस्थांनी दक्ष नागरिकाची भूमिका बजावून प्रशासनास योग्य माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रशासन तुमच्यासोबत असून गावातील प्रत्येकाने कलेक्टर मित्र म्हणून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरडपुरी येथे केले.

पैठण येथील मोक्षघाट, नवेगाव, भिवरन्याय आणि हिरडपुरी येथील नदीपात्रातील वाळू चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांना प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गांभीर्याने जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी दखल घेत थेट पैठण तालुक्यातील गोदापात्रातील गावांना भेट देऊन नदी पात्रातील पाहणी केली. ग्रामस्थांनाही मार्गदर्शन करत संवाद साधला.
घरकुल, वीज जोडणी, कृषी पंप जोडणी, बचत गटांना साहाय्य, कौशल्य विकासातून प्रशिक्षण, पाणी पुरवठा, अन्न धान्य पुरवठा आदींबाबत ग्रामस्थांना विचारपूस करत प्रशासन जनतेसोबत असल्याचा विश्वास ग्रामस्थांना दिला. त्याचबरोबर अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले. ग्रामस्थांनी देखील वाळू उपसा करणाऱ्या विरोधात एकत्र येत गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, कोरोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, शारीरिक अंतर राखावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केले. पाहणी दरम्यान महसूल आणि पोलिस प्रशासनास योग्य त्या सूचना देखील केल्या.
यावेळी त्यांच्यासोबत उप विभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक किशोर पवार, गोरख भामरे आदींसह महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
हिरडपुरीत मोठ्याप्रमाणात वाळू साठा जप्त
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी हिरडपुरीच्या नदी पात्रात प्रत्यक्ष जाऊन याठिकाणी अवैधरित्या जमा करण्यात आलेला वाळू साठा जप्त करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केला.
नाथ मंदिर परिसरात दुकाने सील
वारंवार सूचना देऊनही प्रशासनाच्या आदेशाचा जाणीवपूर्वक भंग केल्याप्रकरणी नाथ मंदिर परिसरातील तीन आस्थापनांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमावलीनुसार दुकाने,आस्थापने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू असतात तर शनिवार आणि रविवार फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतात. असे असताना देखील ग्रामीण भागात काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण अवैधरित्या वाळू उत्खननासंदर्भात पैठण येथील मोक्ष घाट येथे पाहणीसाठी गेले असता परिसरातील गोदावरी प्रसादालय,श्रीनाथ प्रसाद भांडार, व वैष्णवी पैठणी होलसेल आस्थापने सुरू असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने ही तीन दुकाने सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाने तातडीने कारवाई केली.
पैठण मेगा फूड पार्कची पाहणी नाथ उद्योग समुहाच्या पैठण मेगा फूड पार्कची पाहणी देखील जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केली. यामध्ये त्यांनी चित्रप्रदर्शनी, सिरप, टेट्रा, बल्क पॅकेजिंग, मका प्रक्रिया, फ्रोझन आदी विभागांना भेट देऊन येथील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. मोरे, नाथ समुहाचे कृष्णा बोबडे यांची उपस्थिती होती.

गावातील प्रत्येकजण 'कलेक्टर मित्र'