बंद

गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा : पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता

प्रकाशन दिनांक : 31/08/2021

शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) : गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी कामे करावीत. उत्सव काळात नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विहित वेळेत आवश्यक असणारी कामे पूर्ण करावीत, अशा सूचना पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी केल्या.

पोलीस आयुक्तालयात गणेश उत्सव 2021 अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, छावणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. मोरे, सर्व पोलीस उपायुक्त सर्व सहायक पोलीस आयुक्त,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भगत,  यांची उपस्थिती होती.

पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले, गणेश मंडळ यांना ऑनलाईन स्वरूपात परवानगी देण्यात येते. संबंधित मंडळाची माहिती पोलीस, महावितरण विभागांना मनपा, छावणी नगर परिषदेने तत्काळ द्यावी. तसेच शासनाच्या निर्णयानुसार सार्वजनिक गणेश मंडळांनी चार फूट उंचीची गणेश मूर्ती स्थापन करावी. सर्व मूर्तिकारांनी या नियमानुसारच मूर्ती तयार कराव्यात. शिवाय मंडळांनी गणेश आगमन, विसर्जन वेळी मिरवणूक काढू नये. प्रक्षोभक देखावे तयार करू नयेत. श्री दर्शन ऑनलाईन स्वरूपात असावेत. मंडळाच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. लहान मुले, वरीष्ठ नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे,नागरिकांनी पारंपरिकरित्या घरीच गणेशाची आरती करून विसर्जनस्थळी आरती करू नये, आक्षेपार्ह कमानी मंडळांनी उभारू नयेत, याबाबत यंत्रणांनी जागृती करावी, अशा सूचनाही डॉ.गुप्ता यांनी केल्या.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, शासनाच्या ब्रेक द चेनमध्ये कोणत्याही प्रकारची  शिथिलता नसून त्यानुसार सर्वांनी पालन करावे. ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

मनपा आयुक्त पांडेय म्हणाले, हर्सूल तलावात बोट आणि लाईफ गार्डची व्यवस्था करावी. पथदिवे सुव्यवस्थित ठेवावीत. कोरोना सद्यस्थिती पाहता कमीत कमी मंडळांनी गणेश स्थापना करावी, असेही ते म्हणाले.

पोलीस विभागाच्यावतीने सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी मनपा, छावणी नगर परिषद, महावितरण,  सार्वजनिक बांधकाम, बीएसएनएल, घाटी, आरटीओ, ग्रामीण आरोग्य यंत्रणा यांच्याकडून विविध कामे अपेक्षित असल्याचे यावेळी सांगितले.

गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा