बंद

खुल्या मिठाईच्या ट्रे वर मिठाईच्या वापराचा अंतिम दिनांक नमुद करणे बंधनकारक – जिल्हाधिकारी यांचे निर्देश

प्रकाशन दिनांक : 21/10/2020

औरंगाबाद,दि.21 (जिमाका) :  भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण  नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मिठाई विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या खुल्या मिठाईच्या ट्रे वर त्या मिठाईच्या वापराचा  अंतिम दिनांक नमूद करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व मिठाई विक्रेत्यांकडून या आदेशाचे पालन केले जाईल या दृष्टीने संबंधितांना सूचना देऊन आवश्यक कारवाई करावी. तसेच सदर नियमाबाबत ग्राहक व विक्रेते  यांचेपर्यंत योग्य माहिती पोहचवून जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिले आहे.

मिठाईच्या तयार केल्याचा दिनांक नमूद करण्याचे बंधन विक्रेत्यावर नाही. तथापि विक्रेत्यास असा दिनांक नमूद करावयाचा असल्यास त्यास मनाई केलेली नाही. प्राधीकरणाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, मिठाईचा अंतिम वापर दिनांक हा उत्पादकाने त्यातील घटक पदार्थ , साठवण पध्दत व भौगोलिक परीस्थीती नुसार ठरवायचा आहे. या आदेशाला स्थगिती  दिल्याच्या चुकीच्या बातम्या काही हिंदी वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्या आहेत. तसेच याबाबत चुकीचे संदेश सोशल मिडियात  पाठवले जात आहेत.  तथापि या नियमांना कुठलीही स्थगिती नसल्याचे तसेच विक्रेत्यांनी अंतिम दिनांक नमूद करताना दिनांक/महिना/वर्ष असे नमूद करावे.

 Best Before two days/four days  या पध्दतीने अंतिम दिनांक नमूद करु नये असे मिलिंद शाह, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी स्पष्ट केले.