बंद

खासगी रुग्णालयांच्या देयक तपासणीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती

प्रकाशन दिनांक : 10/07/2020

औरंगाबाद, दि. 08 (जिमाका) :- कोवीड 19 प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी रुग्णालयांकडून आकारली जात असलेली देयके ही अवाजवी स्वरूपात आकारली जाऊ नये असे निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जात असलेल्या देयकांची तपासणी करण्यासाठी उदय चौधरी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद यांच्या द्वारा लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे .
या लेखापरीक्षकांनी कमलनयन बजाज रूग्णालय , डॉ.हेगडेवार रुग्णालय, एम.जी.एम.रूग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय,सिग्मा रुग्णालय या खासगी रुग्णालयामार्फत आकारण्यात आलेले देयक वेळीच तपासून ती शासनाने निश्चित केलेल्या दरपत्रकानुसार असल्याची खात्री करणे, जादा दर आकारणी केल्याचे आढळल्यास याबाबत रुग्णालय प्रशासनास कपातीची दुरुस्ती सुचवणे ही जबाबदारी पार पाडावयाची आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित रुग्णाचा आजार तसेच या योजने अंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालय असल्यास , प्राधान्याने पात्र रुग्णास योजनेचा लाभ मिळत असल्याची खात्री करावी. रुग्णालयाने यापूर्वी covid-19 उपचारासाठी आकारण्यात आलेल्या काही देयकांची ( रॅण्डमली) तपासणी करावी.
तसेच खाजगी रुग्णालयाकडून रुग्णाला देण्यात आलेल्या देयकाबाबतच्या तक्रारीची तपासणी करावी. उपरोक्त बाबी बाबत रुग्णालय व्यवस्थापन हे असहकार्य तसेच उपरोक्त बाबी मान्य करीत नसल्यास अशी प्रकरणे अपर जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या निदर्शनास आणून दयावी. तसेच शासन निर्णया प्रमाणे कार्यवाही होईल असे पहावे. खाजगी रुग्णालयांमध्ये प्रशासना तर्फे रुग्णांच्या मदतीसाठी मदत कक्ष कार्यरत असून तेथील अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवावा , अशा सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद यांच्या द्वारा निर्गमित आदेशात नमूद आहे.