बंद

कोवीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रकाशन दिनांक : 04/08/2021

औरंगाबाद, दिनांक 3 (जिमाका)- जिल्ह्यातील कोवीड संसर्गाचे गंभीर रुग्ण बरे करण्याची महत्वपूर्ण कामगिरी घाटी रुग्णालयाने यशस्वीपणे पार पाडलेली आहे. त्याच पध्दतीने संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पर्याप्त स्वरुपात उपचार यंत्रणा प्रशिक्षित मनुष्यबळासह तयार ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली कोवीड-19 विषाणू बाधित मुळे झालेल्या मृत्यूच्या  विश्र्लेषणाबाबत बैठक घेण्यात आली.  या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. मंगेश गोंदावले, अतिरीक्त जिल्हाधिकारी, अनंत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर,  मनपाच्या आरोग्य अधिकारी  डॉ. निता पाडळकर, क्ष-किरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे, औषधवैद्यक विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, शरीरविकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी, डॉ. सुधीर चौधरी, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित   उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी औद्योगिक सामाजिक दायित्व अंतर्गत विविध औद्योगिक संस्था कडून मिळणाऱ्या देणगीतून कोवीड-19 अत्यावश्यक असणाऱ्या विविध यंत्रसामुग्री व इतर आवश्यक बाबी उपलब्ध करुन घेण्यासाठी  त्‍यांची अंदाजे किमतीसह माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. जेणेकरुन औद्योगिक संस्थांनी  सामाजिक दायित्व अंतर्गत संपर्क केल्यास त्यांना ती देता येईल व यंत्रसामुग्री उपलब्ध होऊ शकेल. कोवीडच्या पुढील लाटेकरीता आरोग्य सेवा, महानगरपालिका, जिल्हा परीषद मधील रुग्णालय आवश्यक असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सिग स्टॉफ व इतर सहाय्यक स्टॉफ यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. याचबरोबर आजतागायत प्रशिक्षण घेण्यात आलेल्या विविध संवर्गनिहाय माहिती तपशिलवार सादर करावी. औषधशास्त्र यांनी औषध बैंक तयार करावी ज्यामध्ये विविध संस्था तसेच मान्यवरांकडून देणगी स्वरुपात मिळालेली औषधे स्विकारण्यात यावीत. सदरच्या औषध बैंक करीता नेहमी लागणारे विविध औषधे व त्यांची प्रतिनग किंमत यांची एक यादी तयार करण्यात यावी. सदरची यादी नियमित कालावधीत  अद्ययावत करावी. ज्या संस्था किंवा मान्यवर देणगी करीता संपर्क करतील त्यांना सदरची यादी देण्यात येईल व सदर संस्था ही त्यांच्या देणगी रकमेऐवढे औषधांचा पुरवठा करेल जे की रुग्णांच्या उपचारासाठी कामात येतील.

अधिष्ठाता डॉ येळीकर यांनी  घाटीमध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेत गंभीर स्थितीतील रुग्णांवर यशस्वीरित्या करण्यात आलेल्या उपचारांची माहिती देऊन घाटीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61.60 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 29.90 टक्के इतके आहे.  जिल्ह्यातील विविध रुग्णालयांसह इतर जिल्ह्यातून रुग्णांची तब्येत अधिक खालावल्यानंतर घाटीमध्ये  गंभीर स्थितीत रुग्ण पाठवण्याचे प्रमाण अधिक आहे. जर संबंधित रुग्णालयाने रुग्णाला वेळेत परीस्थितीत नियंत्रणात असतांना घाटीत पाठवले तर रुग्णांचा मृत्यू अधिक प्रमाणात रोखणे शक्य होईल, असे सांगितले.

कोवीड-19 मृत्यू विश्र्लेषण समिती अध्यक्ष डॉ. अनिल जोशी यांनी कोवीड -19 विषाणू बाधित मुळे झालेल्या मृत्यूची विश्र्लेषण बाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. यामध्ये एसओपी कोवीड डेथ ऑडीट, मृत्यू झालेल्या रुग्णांचा वयोगट, रुग्णालयातील वास्तव्य कालावधी, कामॉविड, इतर रुग्णालय, जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांचे प्रमाण आणि लक्षणेअसणे याबाबत सविस्तर माहिती दिली.

डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी कोवीड-19 मध्ये केलेल्या रुग्णसेवा व पुढील कोवीडची तिसऱ्या लाटेसाठी प्रतिबंध यावर सादरीकरण केले. यामध्ये घाटीत आलेल्या गंभीर रुग्णाच्या मृत्यूची कारणे इतर रुग्णालयांनी घाटीकडे रुग्ण पाठवण्यामागची कारणे, मृत्यू प्रमाण कमी होण्यासाठी घ्यावयाची खबरदारी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक तयारी याबाबत माहिती दिली

कोवीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश