बंद

कोविड-19 लसीकरण मोहीमेच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 28/12/2020

औरंगाबाद, दिनांक 28 (जिमाका): कोविड-19 लसीकरण मोहीम प्रथम प्राधान्याने जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहे. या मोहीमेच्या यशस्वीतेसााठी यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित काविड-19 लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी बी.वी. नेमाने, अतिरीक्त आयुक्त, मनपा, सुनील लांजेवार, अतिरीक्त पोलीस अधीक्षक, मीना मकवाना, पोलीस उपायुक्त,  डॉ. नीता पाडळकर, मनपा आरोग्य अधिकारी, डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी लसीकरण हे कोवीड प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील एक महत्वाचा टप्पा असून सर्वांच्या सुरक्षिततेचा हा विषय आहे. यामध्ये प्रत्येकाची भूमिका महत्वाची असून कोणत्याही प्रकारची हयगय या लसीकरण कार्यक्रमामध्ये होणार नाही याबाबत सर्वांनी दक्ष रहावे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केल्या जाईल, असे निर्देशित करून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात प्रथम टप्यात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, सहायक, कर्मचारी, पॅरामेडीकल स्टाफ, यांच्यासह सर्व शासकीय, खासगी आरोग्य यंत्रणांमधील सर्वांची लसीकरणासाठी नोंदणी करून त्यांना लस देण्याचे नियोजन करावयाचे असून  तालुका स्तरावर तसेच प्रभाग निहाय लसीकरण मोहीमेच्या अंमलबजावणी बाबतचे प्रशिक्षण कार्यक्षम, पूर्व नियोजन याची तयारी संबंधितांनी ठेवावी. तसेच सर्व कार्यालयांनी, प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करत असलेल्या सर्वांनी आपल्या येथील अधिकारी, कर्मचारी व सर्व इतर संबंधित यांच्या लसीकरणाच्या दृष्टीने नोंदणीसाठीची माहिती संकलनाची पूर्व तयारी सुरू करावी. कारण जिल्ह्यात प्रत्येकाला ही लस देण्यात येणार असून ती व्यवस्थितरित्या सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्व नियोजन सर्वांनी करावे, असे सूचीत करून श्री. चव्हाण यांनी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी तहसिलदार यांनी प्राधान्याने तालुका कृती दलाची साप्ताहिक आढावा बैठक घेऊन लसीकरण मोहीमेची अंमलबजावणी प्रभावीरित्या होण्याच्या दृष्टीने सर्व व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या.

तसेच प्रत्येकाने सोपविलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. सर्व संबंधितांना पूर्व प्रशिक्षण देऊन जनजागृती करून लसीकरणासाठीची  तयारी सज्ज ठेवावी, असे निर्देशित करून श्री. चव्हाण यांनी  परस्पर समन्वयातून ही मोहिम जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी करावयाची आहे. त्याचप्रमाणे लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने सर्वांनी नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या.

          जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील 12307 जणांना लस देण्यात  येणार असून आतापर्यत 11463 जणांची माहिती अपलोड करण्यात आल्याची माहिती डॉ. वाघ यांनी दिली. तालुकानिहाय करण्यात येत असलेल्या पूर्व तयारीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, नगरपालिका अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित जिल्हा, तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

कोविड-19 लसीकरण मोहीमेच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण