कोविड-19 लसीकरणासाठी परिपूर्ण नियोजनासह सज्ज रहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 14/12/2020
औरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका): केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणासाठी तीन टप्यात मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी परिपूर्ण नियोजनासह सर्व संबंधितांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित काविड-19 लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा व तालुका स्तरावरील नियोजन व अंमलबजावणी बाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, डॉ. वाघ जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात प्रथम टप्यात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, सहायक, कर्मचारी, पॅरामेडीकल स्टाफ, यांच्यासह सर्व शासकीय, खासगी आरोग्य यंत्रणांमधील सर्वांची लसीकरणासाठी नोंदणी करून त्यांना लस देण्याचे नियोजन करावे, असे सूचीत करून जिल्हा कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने लसीकरण मोहिम चोखरित्या व्यापक प्रमाणात यशस्वी होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने सोपविलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. सर्व संबंधितांना पूर्व प्रशिक्षण देऊन जनजागृती करून लसीकरणासाठीची संपूर्ण तयारी सर्व यंत्रणांनी समन्वयपूर्वक सज्ज ठेवावी, असे निर्देशित करून श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पात्र, नोंदणी केलेल्या प्रत्येकाला लस उपलब्ध करून दिल्या जाईल, तसेच लसीकरणासाठी सर्वांची पूर्व नोंदणी आवश्यक असून नोंदणी केलेल्यांना लसीकरणाची वेळ, ठिकाण, दिनांक याबाबतची माहिती मोबाईलवर मेसेजव्दारा देण्यात येईल. तसेच संबंधित आरोग्य यंत्रणेव्दाराही याबाबत माहिती दिल्या जाईल. लसीकरणाच्या कामामध्ये बचत गटांच्या सदस्य, लोकप्रतिनिधी, खासगी डॉक्टर, शैक्षणिक विभाग, पोलीस यांच्यासह सर्व संबंधितांचे सहाय्य घेऊन परस्पर समन्वयातून ही मोहिम जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी करावयाची आहे. त्याचप्रमाणे लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कारण मास्क वापर हे प्रभावी औषध आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या. बैठकीस अनुपस्थित असलेल्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
लसीकरण मोहिम तीन टप्यात राबवली जाणार असून पहिल्या टप्यात आरोग्य क्षेत्रातील सर्वांना लस देण्यात येणार असून पोलीस, सुरक्षा रक्षक, होमगार्ड, सॅनिटायझर वर्कर, मनपा यासह प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत सर्वांचे दुसऱ्या टप्प्यात लसीकरण केल्या जाणार आहे. तर पन्नास वर्षावरचे सर्व तसेच पन्नाशीच्या आत कोमॉब्रिड असलेले अशांना तिसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर याबाबत नियोजन व अंमलबजावणी करण्यात येणार असून दोन्ही स्तरावर साप्ताहिक आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती डॉ. वाघ यांनी यावळी दिली.
डॉ. मुजीब यांनी लसीकरणासाठीचे प्रशिक्षण, संबंधितांची भूमिका, जबाबदारी, आवश्यक साधनसामुग्री, जागेची निवड, उद्भवणाऱ्या समस्या, प्रत्यक्ष अंमलबजावणीतील आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन यावेळी केले.
बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, नगरपालिका अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित जिल्हा, तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
