बंद

कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वांची नोंदणी तत्परतेने पूर्ण करावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 22/12/2020

 

औरंगाबाद दि.22 (जिमाका) : कोविड-19 लसीकरणाची प्रक्रिया जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय महत्वाचा असून पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी आरोग्य क्षेत्रातील सर्वजणांची नोंदणी तत्परतेने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड-19 लसीकरण बाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. वाघ, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.

            श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळत असून रूग्ण संख्या कमी होत आहे. त्यासोबतच जिल्ह्याचा रूग्ण बरे होण्याचा दर 96 टक्यांपर्यंत पोहचला असून सर्व यंत्रणांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमूळे आपण संसर्ग आटोक्यात ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहोत, असे सांगून श्री. चव्हाण यांनी जगभरात आता दूसऱ्या लाटेच्या संसर्गाची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कतेने तयार राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपचार सुविधा, औषधसाठा, खाटा, ऑक्सीजन या सर्वाची पूरेशी उपलब्धता आहे. मात्र तरीही नागरिकांनी मास्क वापर, सॅनिटायजर, अंतर राखणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

          तसेच प्रतिबंधात्मक उपचारासोबत आता जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहिम टप्पेनिहाय राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रथम टप्यात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, सहायक, कर्मचारी, पॅरामेडीकल स्टाफ, यांच्यासह सर्व शासकीय, खासगी आरोग्य यंत्रणांमधील सर्वांची लसीकरणासाठी नोंदणी करून त्यांना लस देण्याचे नियोजन करावयाचे आहे. यामध्ये पूर्व नोंदणी असलेल्यांनाच लस देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर ते पॅरामेडीकल स्टाफ पर्यंत एकूण एक जणांनाही लस देण्यात येणार आहे. त्यामूळे शासकीय, खासगी सर्व संबंधित आरोग्य क्षेत्रातील लोकांची नोंदणी शंभर टक्के पूर्ण करावी. सर्व कार्यालयीन कागदपत्रांवर आरोग्य यंत्रणांनी लसीकरण स्टॅम्प मारावा. मोठ्या प्रमाणात लसीकरण नोंदणी बाबत जनजागृती करावी. जेणे करून सर्वांना व्यवस्थितरित्या लस उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वांनी समन्वय आणि नियोजनासह ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले.

          लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सध्या सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सेवक, पॅरामेडीकल स्टाफ, आरोग्य केंद्रावर येणारे इतर संबंधित या सर्व शासकीय, खासगी, शहरी, ग्रामीण, सर्व आरोग्य क्षेत्राशी निगडीत लोकांची नोंदणी करून त्यांना लस देण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर अर्धा तास प्रत्येकाला लसीकरण केंद्रावरच निरीक्षणाखाली थांबवण्यात येणार असून पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी संबंधित व्यक्तीला दुसरी लस देण्यात येईल. पोलीस, सुरक्षा रक्षक, होमगार्ड, सॅनिटायझर वर्कर, मनपा यासह प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत सर्वांचे दुसऱ्या टप्प्यात लसीकरण केल्या जाणार आहे. तर पन्नास वर्षावरचे सर्व तसेच पन्नाशीच्या आत कोमॉब्रिड असलेले अशांना तिसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर याबाबत नियोजन व अंमलबजावणी करण्यात येणार असून दोन्ही स्तरावर साप्ताहिक आढावा घेतला जाणार आहे. या अनुषंगाने करावयाची पूर्व तयारी, प्रत्येकाची जबाबदारी, लसीकरणासाठीचे प्रशिक्षण, संबंधितांची भूमिका, आवश्यक साधनसामुग्री, जागेची निवड, उद्भवणाऱ्या समस्या, प्रत्यक्ष अंमलबजावणीतील आव्हाने याबाबत डॉ. मुजीब, डॉ. वाघ यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेस जिल्हा, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह जिल्हा, तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणांचे अधिकारी, सर्व संबंधित उपस्थित होते.

कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वांची नोंदणी तत्परतेने पूर्ण करावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण