बंद

कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

प्रकाशन दिनांक : 02/03/2021

औरंगाबाद दि.01 (जिमाका) – देशात कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक, 45 वर्ष आणि व्याधीग्रस्त असेल त्यांना कोविड लस शासकीय रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्य केंद्रे येथे मोफत देण्यात येणार आहे. तर खासगी रूग्णालयात 250 रू. प्रतिव्यक्ती शुल्क अकारण्यात येईल, असे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी कळविले आहे.

          आयुष्यमान भारत योजना महात्मा जोतीबा फुले योजनेच्या पॅनलवर असतील, ज्यांच्याकडे शीतगृह व रूग्णांची काळजी घेण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुविधा असेल, अशाच खासगी रूग्णालयात लसीकरण देण्याची परवानगी शासन स्तरावरून दिली जाईल. लसीकरण दोन प्रकारे करता येईल. cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पसंतीनुसार कोविड लसीकरण केंद्र निवडता येईल. लस घेण्यासाठी किमान 24 तास अगोदर नोंदणी आवश्यक आहे. तर ऑनसाईट रजिस्टे्रशन पद्धतीत लाभार्थ्याला लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करता येईल. नोंदणी करते वेळी 60 वर्ष वयोगटावरील व्यक्तींनी आधार किंवा वयाचा दाखला सोबत ठेवावा. मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर लाभार्थ्याची पडताळणी होईल. त्यासाठी मोबाईल जवळ असणे आवश्यक आहे. एका मोबाईलवर एका घरातील 4 व्यक्ती नोंदणी करू शकतात. 45 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्याधीग्रस्त असल्यास नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रमाणपत्र शासनाच्या विहित नमुन्यात आणणे बंधनकारक आहे. केंद्राने 20 प्रकारच्या व्याधींची यादी प्रसिद्ध केलेली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास येणाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात लस देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सर्व ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूगणालय येथे लसीकरण सुरू आहे. यासह आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर यांचे पहिला व दुसरा डोस लसीकरण चालू असणार आहे. ज्यांची कोविन ॲपमध्ये नावे नाहीत. त्यांना ऑनसाईट रजिस्ट्रेशन पद्धतीचा अवलंब करून लस घेता येईल. लाभार्थ्यांना लसीकरण नोंदणी समस्या व लसीकरणानंतर काही गुंतागुंत जाणवल्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रूगणालयाशी संपर्क साधावा.

लस खासगी रूग्णालयांमध्ये जिल्ह्यातील काबरा, इंटरनॅशनल, जे.जे.प्लस, सेंच्युरी मल्टीस्पेशालिटी, सावजी मल्टीस्पेशालिटी, संजीवनी चिल्ड्रन, आयकॉन, कृपामयी, उत्कर्ष, निमाई, केअरवेल, डॉ. दहिफळे फाऊंडेशन, एमजीएम, वायएसके, माणिक, लाईफलाईन, सिग्मा, एमआयटी, डॉ. हेडगेवार, बजाज, अल्पाईन, साई कृष्णा, आदर्श सहकारी, साई हॉस्पीटल, पैठण, श्री.मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, गणपती आयसीयू, फुलंब्री, अजंता मल्टी स्पेशालिटी, सिल्लोड, वाळूज हॉस्पीटल, धूत हॉस्पीटल यांचा समावेश आहे. 

लसीकरणासाठी टप्याटप्याने बूथ वाढवणार : डॉ. गव्हाणे

कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी व्यवस्थित व नियोजनपूर्वकरित्या लस घेण्याचे आवाहन प्र.जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी केले आहे. तसेच लसीकरण बूथची संख्याही टप्याटप्याने वाढवणार असल्याचेही ते म्हणाले.