कोविड लसीकरणाचा आज ड्रायरन -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 11/01/2021
v सकाळी 9 ते 11 यावेळेत होणार रंगीत तालिम
औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : कोविड लसीकरणाची पूर्वतयारीची रंगीत तालिम म्हणजेच कोविड लसीकरणाचा ड्रायरन जिल्ह्यातील ग्रामीण भागात दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या बजाज नगरच्या शहीद भगतसिंग शाळा आणि वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार, 08 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 या कालावधीत प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. तरी प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी केंद्रांवर 25 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे, संबंधितांनी वेळेवर केंद्रांवर पोहोचावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.चव्हाण म्हणाले, कोविड लसीकरणाबाबत पूर्व तयारी म्हणून प्रशासनाने एकूण पाच बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सुक्ष्मपद्धतीने नियोजन केले. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना लसीकरण करण्यात येणार आहे. जवळपास 50 हजार आरोग्य यंत्रणेतील सेवकांची लसीकरणासाठी नोंदणी प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नोंदणीचे अजूनही काम सुरू आहे. प्रशासनाने केलेल्या लसीकरणाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणूनच नंदूरबार, जालना, नागपूर व पिंपरी चिंचवड या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन केंद्रांवर लसीकरणाचा ड्रायरन घेण्यात येणार आहे. या ड्राय रन मध्ये कोविड 19 आजारांवरील प्रत्यक्ष लशीशिवाय इतर सर्व प्रक्रिया आणि त्याला लागणारा वेळ याबाबत चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विशेषत: औरंगाबाद जिल्ह्यात थर्मल गनद्वारे रुग्णांची तपासणी आशा सेविका करणार आहेत. सुरूवातीला कोविड लस घेणाऱ्या व्यक्तीचे नाव पोलिस कर्मचारी यादीत तपासणी करतील. मास्क परिधान करून आलेल्या लाभार्थ्यासच लसीकरण कक्षात प्रवेश देण्यास संमती देतील. मास्कशिवाय आलेल्या लाभार्थ्यास मात्र कक्षात प्रवेश मिळणार नाही. त्यानंतर कक्षातील शिक्षक ओळखीच्या पुराव्यांची तपासणी करून लसीकरण होत असलेल्या कक्षामध्ये लाभार्थ्यास प्रवेश देतील. या कक्षामध्ये एएनएम आणि आशा सेविका लसीकरणाबाबतची करावयाची प्रक्रिया पार पाडतील. डा्रयरनमध्ये लसशिवाय इतर सर्व सोपस्कार पार पाडले जातील. त्यानंतर लस घेतल्यानंतर संबंधितास एका वेगळया कक्षात 30 मिनिटांकरीता तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल, अशा प्रकारे जिल्ह्यात लसीकरण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये पोलिस, ग्रामपंचायत, महसूल आणि मनपा, आरोग्य यंत्रणा आदींच्या समन्वयाने लसीकरण मोहीम राबविण्यात येते आहे. त्या लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी पाहण्यासाठी हा ड्रायरन महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांना त्यांची भूमिकादेखील यातून कळण्यास मदत होणार असल्याचे श्री.चव्हाण म्हणाले.
