बंद

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

प्रकाशन दिनांक : 21/08/2021

औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात कोवीड संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत कोविड आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना सूचित केले. यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात सर्व व्यवहार खुले करण्यात आल्याने संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन चाचण्या आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवावे असे सूचित करुन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय रुग्णालयात आरोग्य यंत्रणानी मुबलक ऑक्सिजन उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने सज्ज राहावे. नागरिकांनी मास्क्‍ वापरासह नियमांचे पालन करणे हे स्वत:सह जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे. यादृष्टीने सर्व संबंधितांनी सर्तकतेने मास्क वापरासह सर्व नियमांचे पालन करुन घेण्याच्या अनुषंगाने नियंत्रण ठेवावे.आरटीओ, वजनमापे, अन्न व औषध प्रशासन यासह इतर सर्व यंत्रणांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी सर्व आस्थापनांनी, दुकानदारांनी, व्यावसायिकांनी महिन्याला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असून लसीकरणाचे प्रमाणही वाढणे हे सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक आहे.  प्राधान्याने सीएसआर फंडातून अतिरिक्त लससाठा उपलब्ध करुन तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण शिबिरांचे आयोजन स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत घेऊन करण्यात येणार आहे. यामध्ये वेरुळ, अंजिठा याठिकाणी सर्व स्थानिकांचे शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट लवकारात लवकर पूर्ण करावे जेणे करुन त्याठिकाणी बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांकडून होणाऱ्या संसर्गाचा धोका राहणार नाही. तसेच पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळेल. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या.

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना