बंद

कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना योजनांचा लाभ तत्काळ द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 08/06/2021

  • जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
  • जिल्ह्यातील 339 पाल्यांना महिला व बालविकास विभागाकडून मिळणार मदत
  • विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका) : कोविड 19 विषाणूमुळे आई वडिलांपैकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांच्या न्याय्य हक्काबरोबरच शासनाच्या योजनांचा लाभ तत्काळ मिळवून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हा कृती दलाची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ज्योती पत्की, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, चाईल्ड हेल्पलाईन व मराठवाडा ग्रामविकास संस्थेचे प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले आदींसह विविध संस्था, पोलिस, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

एक पालक गमावलेल्या 326 आणि दोन्ही पालक गमावलेल्या 13 बालकांना शासनाच्या नियमानुसार असणाऱ्या सर्व योजनांचा, 265 विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी केल्या. दोन्ही पालक गमावलेल्या 13 बालकांपैकी तीन बालकांना बालगृहात प्रवेशित करण्यात येणार आहे. तर 10 बालकांना बाल कल्याण समितीसमोर उपस्थित करून दरमहा अकराशे रूपये प्रतिमाह योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लाभ देण्याची कार्यवाही आठवडाभरात पूर्ण करावी, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या. पालक गमावलेल्या बालकांसाठीच्या शासनाच्या योजनेबाबत महिला व बालविकास विभागाने सर्वदूर प्रसिद्धी करावी, असेही चव्हाण म्हणाले.

पॅम्प्लेटच्या साहाय्याने ग्रामीण भागात बालकांच्या योजनांबाबत जागृती करावी. आगामी काळातील कोविड विषाणूचा संक्रमनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन बालकांच्या काळजीबाबत जनजागृती करावी. यासाठी विविध सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी, असे डॉ. गव्हाणे यांनी सांगितले. श्रीमती देशमुख यांनी जिल्ह्यातील पालक, बालक यांच्याबाबत सविस्तर माहिती सादर केली.  

चाईल्ड हेल्पलाईनचे साहाय्य

चोविस तास सुरू असलेल्या चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 मार्फत जिल्ह्यात कोविडमुळे 30 बालकांनी पालक गमावल्याची नोंद झाल्याची माहिती श्री. उगले यांनी दिली. हेल्पलाईनच्या माध्यमातून मार्च 2020 पासून ते आजपर्यंत 465 बालकांना अन्नधान्य पुरविल्याचेही ते म्हणाले.

कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना योजनांचा लाभ तत्काळ द्या - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण