कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 02/02/2021
औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका):जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करावयाची असून त्यादृष्टीने लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी तथा कोविड-19 लसिकरण कृतिदल समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड-19 लसीकरणाच्या अंमलबजावणी बाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. वाघ, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी आतापर्यंत जिल्ह्यात करण्यात आलेल्या लसीरणाबाबतची माहिती घेऊन
लसीकरणामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कुणालाही गंभीर स्वरूपाचा त्रास झालेला नाही. मात्र तरीही संभाव्य शक्यतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रूग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मनपा वैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्तरित्या लसीकरणानंतर जर कुणाला गंभीर स्वरूपाचा त्रास जाणवला तर त्यांची निगराणी ठेवण्यासाठीची नियमावली (sop) तयार करावी. लसीकरण मोहीमेच्या सर्व टप्प्यांवर योग्य नियोजन आणि पूर्व तयारी ठेऊन मोहीम यशस्वी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देश दिले. तसेच लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास होत नसून जो सौम्य स्वरूपातील त्रास हा स्वाभाविक आणि उपचारांनी बरा होणारा आहे. ही लस संपुर्ण सुरक्षीत असुन अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले.
आजपर्यंत भारतात 37 लक्षपेक्षा जास्त लोकांना तसेच महाराष्ट्रात 2.7 लक्ष लोकांना, तर औरंगाबाद जिल्हयात 8114 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात आलेली आहे. आतापर्यंत लस देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही गंभीर लक्षणे दिसुन आलेली नाहीत असे सांगून डॉ.वाघ यांनी जिल्ह्यातील लसीकरणाच्या पूढील नियोजनाबाबत माहिती दिली.
