कोरोना योद्धा व परिवारासाठी प्रतिसाद कक्षाची स्थापना – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 22/08/2020
औरंगाबाद, दि.21 (जिमाका) : भारतीय लष्करामध्ये जखमी सैनिकांबाबत ज्याप्रमाणे वैद्यकीय सुविधांचा प्रोटोकॉल आहे त्याचधर्तीवर ‘कोरोना योद्धा’ व त्याच्या परिवारास तत्काळ आवश्यक ती मदत होऊन त्यांचे आत्मबल वाढावे, कोविड-19 या संसर्गाच्या अनुषंगाने कामकाज करताना त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासन आहे, अशी त्यांच्यात भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ‘कोरोना योद्धा’, त्यांच्या परिवारास तत्काळ मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रतिसाद कक्षाची’ स्थापना करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
या कक्षाचे संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले (मो. क्र.8888844454) आणि सहाय्यक म्हणून नायब तहसिलदार सिद्धार्थ धनजकर (मो.क्र. 9130092121)यांना तत्काळ ‘प्रतिसाद कक्ष’ तयार करणे, जिल्ह्यातील ‘ कोरोना योध्दा ‘ म्हणून काम करताना कोविडने बाधित होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबासाठी कोविडच्या अनुषंगाने आवश्यक ती मदत त्वरीत मिळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करणे व समन्वय साधणे. नियुक्त अधिकारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हयातील ‘कोरोना योध्दा ‘ म्हणून काम करतांना कोविडने बाधित होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ आवश्यक ती सर्व मदत वेळेवर करावी व वेळोवेळी अहवाल सादर करावा, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले आहे.
कोरोना विषाणू हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हयामध्ये प्रसार होत असताना कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता, त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तत्काळ उपयोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी ‘कोरोना योद्धा’ म्हणून कार्य करत आहेत. जिल्हयातील अधिकारी व कर्मचारी यांना किंवा त्यांच्या परिवारामधील सदस्यांना कोविड -19 चा संसर्ग झाल्यास त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत होणे अत्यावश्यक आहे. याअनुषंगाने सदरील प्रतिसाद कक्षाची स्थापना करण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.