बंद

कोरोना योद्धांवरील हल्ले सहन केले जाणार नाही – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 16/04/2021

·       ग्रामीण रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी

·       जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या द्वारा पाहणी

औरंगाबाद,दि.१६(जिमाका) कोरोना आरोग्य आपत्तीत दिवस रात्र मेहनत घेऊन डॉक्टर, सिस्टर आणि आरोग्य यंत्रणा गेल्या  वर्षभरापासून अविरत काम करत आहेत. त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांनी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनी  डॉक्टर, सिस्टर यांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोना योद्धांवरील हल्ले सहन केले जाणार नाही असा इशारा दिला. तसेच ग्रामीण रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आज येथे दिले.  

बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी  डॉ.संजय गोरे यांच्या वर रुग्णालयात कर्तव्य बजावत असताना फाद हुसैन चाऊस या इसमाद्वारा हल्ला करण्यात आला होता. त्या संदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी बिडकीन येथे डॉ.गोरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. घडलेल्या प्रसंगाची माहिती घेऊन जिल्हाधिकारी यांनी  स्वतः  डॉ.संजय गोरे यांना सोबत नेऊन बिडकीन पोलीस ठाण्यात   गुन्हा दाखल केला.

बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात कर्तव्यावरील वैद्यकीय  अधिकारी डॉ. संजय गोरे यांना फाद हुसैन चाऊस या इसमाकडून रविवारी मारहाण झाल्याची घटना घडली होती. सदरील आरोपी त्याच्या हाताला जखम झालेली असल्याने त्यावर उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आला होता.मात्र यावेळी उपस्थित सिस्टर जखमेवर उपचार करत असताना आरोपीने त्या सिस्टरचा हात धरून आरडाओरडा सुरू केला.त्याला तसे गैरवर्तन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी डॉ.गोरे पुढे झाले असता   त्यांना आरोपीने मारहाण करत शिवीगाळ केली होती. या धक्क्यामुळे डॉ गोरे यांना शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याने त्यांनी तक्रार दाखल केली नव्हती. मात्र या हल्ल्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः बिडकीनला जाऊन गोरे यांची भेट घेत,धीर दिला.तुम्ही म्हणजे माझे कुटुंब आहात .आपल्या सगळ्यांना मिळून जिल्हयाची काळजी घ्यायची आहे.मात्र हे होत असताना जर काही अन्याय होत असेल तर कायदेशीर पद्धतीने आवाज उठवलाच पाहिजे,तसेच अन्याय सहन करणे हा मोठा गुन्हा असल्याचं त्यांनी सांगितले. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आणि एक जिल्हाधिकारी नाही, तर मोठा भाऊ म्हणून तुमच्याकडे आलो आहोत अश्या शब्दात त्यांनी सांत्वन केले.त्यांनतर जिल्हाधिकारी यांनी डॉ. गोरे यांना स्वतःच्या गाडीत बसवून बिडकीन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. गुन्हा दाखल होण्याच्या सर्व प्रक्रिया होइपर्यंत जिल्हाधिकारी स्वत: पोलीस ठाण्यात  थांबले. सदरील प्रकरणात भादंवि 1860 च्या कलम 353,354 a, 294,333,323,506 तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा – व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था ( हिंसक‌कृत्य आणि मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध ) अधिनियम 2010 अंतर्गत कलम 3 व 4 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दखल झाल्यानंतर संबंधित आरोपीला शोधून त्वरित अटक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर गोरे यांना पुन्हा जिल्हाधिकारी यांनी  रुग्णालयात सोडले.तसेच  तुमच्या पाठीमागे प्रशासन खंबीरपणे असल्याचे सांगून  राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचे मोठं संकट उभं राहिलं आहे. या  महामारीच्या काळात पोलीस,आरोग्य अधिकारीसह सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांसाठी लढत आहे. त्यामुळे आशा कोरोना योद्धांवरील हल्ले सहन केले जाणार नाही,असा इशाराही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिला.

यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ विजय वाघ यांच्या सह संबंधित उपस्थित होते.