बंद

कोरोनाच्या वैद्यकीय बिलात आकारलेली जादा रक्कम सात दिवसांत परत करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 12/11/2020

औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका)  : औरंगाबाद शहरातील 14 खासगी रुग्णालयांनी कोरोना आजाराच्या वैद्यकीय बिलात रुग्णांकडून जादा रक्कम आकारणी केली होती. त्यापैकी सात रूग्णालयांनी जादा आकारणी केलेली रक्कम सर्व रुग्णांना परत केली आहे. मात्र, उर्वरीत सात खासगी रुग्णालयांनी अद्याप काही रूग्णांना जादा आकारणी केलेली रक्कम परत केलेली नाही, या रूग्णालयांवर दंडात्मक अथवा फौजदारी स्वरूपाची अथवा रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खासगी रूग्णालयांना दिलेला आहे

डॉ. हेडगेवार, सेठ नंदलाल धूत, एशियन, लाईफलाईन, वायएसके, अजिंठा आणि कृष्णा रुग्णालयांकडील 37 लाख 37 हजार 299 एवढी रक्कम रुग्णांना परत करण्यात आलेली नसल्याने त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. सात दिवसांमध्ये रुग्णांना पैसे परत करण्याबाबत या रुग्णालयांना अंतिम संधी दिलेली आहे. जादा आकारणी केलेली रक्कम रूग्णांना परत केली नाही तर त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन 1949, बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट 2006 मधील तरतुदीनुसार, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे 21 मे 2020 व 31 ऑगस्ट 2020 च्या तरतुदीनुसार दंडात्मक अथवा फौजदारी स्वरूपाची अथवा रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबतची कारवाई करण्याचा जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी इशारा दिला आहे.

औरंगाबादेतील डॉ. हेडगेवार, सेठ नंदलाल धूत, एशियन, लाईफलाईन, वायएसके, अजिंठा, कृष्णा आणि युनायटेड सिग्मा, एमआयटी, ओरियन सिटी केअर, ॲपेक्स, वुई केअर, एकविरा आणि हयात या 14 रुग्णालयांनी रुग्णांना वैद्यकीय बिलामध्ये 62 लाख 33 हजार 294 रूपये जादा रक्कम कोरोना रुग्णांकडून आकारलेली होती. याबाबत 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी संबंधित खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे ऑक्टोबर अखेर सर्व 14 रुग्णालयांनी कारणे दाखवा नोटीसचा खुलासा सादर केलेला आहे. सदर खुलासा संबंधित हॉस्पिटलला नियुक्त सहाय्यक लेखाधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेतलेला आहे.

या 14 हॉस्पिटलपैकी युनायटेड सिग्मा, एमआयटी, ओरियन सिटी केअर, ॲपेक्स, वुई केअर, एकविरा आणि हयात या सात खासगी रूग्णालयांनी त्यांच्याकडील जादा आकारणी केलेली पूर्ण रक्कम संबंधित रूग्णांस परत केलेली आहे. तर डॉ. हेडगेवार, सेठ नंदलाल धूत, एशियन हॉस्पीटल, लाईफलाइन, अजिंठा या खासगी रूग्णालयांच्या अंशत: रूग्णांना रक्कम अदा केली आहे. तरी या 14 खासगी रूग्णालयांची मिळून एकूण 24 लाख 95 हजार 995 जादा आकारलेली रक्कम संबंधित रुग्णांना परत केलेली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.