कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 14/05/2021
- जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सुनपूर्व आढावा
औरंगाबाद, दि.14, (जिमाका) :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करीत सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सर्व यंत्रणा प्रमुखांना दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहूल, शहर अभियंता सखाराम पानझडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका पातळीवरील सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना केला आहे. आता येणाऱ्या मान्सूनच्या संभाव्य आपत्तीसाठीही सर्व यंत्रणांनी आपल्या विभागातील नियोजन तयारीसह करुन सज्ज राहावे. तसेच काही अडचणी, धोके, लक्षात येताच तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास वेळोवेळी कळविणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित आपत्ती वेळीच रोखली जाईल. जिल्ह्यात 01 मोठे असलेले (जायकवाडी) तसेच 16 मध्यम तर 96 लहान असे एकूण 113 पाटबंधारे प्रकल्पांशिवाय बरेच पाझर तलाव, जुने तलाव ही आहेत. या तलावांच्या सर्वेक्षणासह त्यांची गळती बाबत तपासणी करुन तात्काळ अहवाल सादर करावा. या तलावांची दुरूस्ती व पुर परिस्थितीचे नियोजन करावे. त्याचबरोबर संभाव्य धोक्यांच्या ठिकाणी नागरिकांना माहिती व सावध करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण सूचनांचे फलक लावावेत असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच पूर बचाव साहित्य अद्यावत ठेवून त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक यंत्रणांना माहिती असणे आवश्यक आहे. पूर परिस्थिती उद्भवल्यास व गावांचा संपर्क तुटल्यास वीजपुरवठा, साथ रोग नियंत्रणासाठी औषधसाठा, अन्नधान्याचा अतिरिक्त पुरवठा, जनावरांसाठी औषधसाठा, उपलब्ध 8 बोटी व त्यांचे प्रशिक्षित चालक या सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन करीत सतर्क राहण्याचीही सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी संबंधित यंत्रणाप्रमुखांना केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनीही पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीस संबंधित विभाग नियोजन करीत असून परस्पर समन्वय राखत असल्याचे सांगत, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच कोरोनावरील दुसऱ्या डोसच्या लसीकरणाची तयारीही असल्याचे सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी जिल्ह्यातील विविध विभागातील मान्सूनपूर्व तयारी बाबत संगणकीय सादरीकरण करीत विविध सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनीही पावसाळ्यातील पूरपरिस्थितीमुळे धोका असलेले पूल, जुन्या इमारती यांची पाहणी करुन संबंधितांनी अहवाल सादर करावा. तसेच वीज पडून होणारी जीवित हानी टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी व खबरदारी याबाबत लोक जाणीवजागृती करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
