बंद

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज – अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशन दिनांक : 24/05/2021

नागरिकांनी खबरदारी बाळगावी

औरंगाबाद, दिनांक 24(जिमाका)- जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर 93.62 टक्क्यांवर आलेला आहे. तरी संसर्गाचे प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी नागरीकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपचारांच्या नियोजनसह प्रशासन सज्ज असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या आढावा बैठकीत अपर जिल्हधिकारी डॉ.अनंत गव्हाणे बोलत होते. यावेळी आ. हरीभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्यासह सर्व संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. गव्हाणे यांनी जिल्ह्यातील वाढता संसर्ग आटोक्यात आणण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असून बाधितांचे प्रमाण कमी होत असून आतापर्यंतचा बाधित दर 12.85% तर आतापर्यंतचा मृत्यू दर 2.18 टक्के असल्याचे सांगून कोरेानातून बरे झालेल्यांमध्ये सध्या म्युकर मायकोसिस या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्याच्यासाठी आवश्यक औषध, इंजेक्शनची उपलब्धता जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात ठेवण्यासाठी राज्य शासनाकडे दैनंदिन इंजेक्शन मागणी रुग्णांच्या प्रमाणात नोंदण्यात येत आहे. प्राप्त इंजेक्शन रुग्णालयांना वितरीत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेच्या संसर्गाला रोखण्यासाठी लहाण मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाढीव उपचार सुविधा तयार करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. गव्हाणे यांनी गरवारे कंपनी परिसरात तयार करण्यात येत असलेल्या बाल उपचार केंद्राची माहिती दिली. या ठिकाणी मुलांना मनोरंजनात्मक वातावरणात उपचार देण्याच्या दृष्टीने नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात ऑक्सीजन निर्मित यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. खासगी रुग्णांलयांनीही आता स्वत:चे प्रकल्प मोठ्या संख्येने सुरु केले असल्याचे सांगून ग्रामीण रुग्णालयातही ऑक्सीजन प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ. गव्हाणे यांनी सांगितले.

मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी शहरात संसर्ग आटोक्यात येत असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगून बालरोग तज्ञांसोबत बैठका घेऊन लहाण मुलांच्या उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत नियोजन करत आहे. तसेच मनपा लहान मुलांसाठी कोवीड केअर सेंटर सुरु करणार आहे. मनपाच्या बालरोग तज्ञांना घाटीत विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले.

डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागातही लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालक, मुल यांच्यासाठी माहितीपर व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगून लसीच्या दुसऱ्या टप्यातील लोकांना प्राधान्याने लस उपलब्ध करुन देत असल्याची माहिती यावेळी दिली.

आ. सावे यांनी 50 खाटा पुढील शहरी, ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयांना स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करणे बंधनकारक करावे, असे सूचीत केले. तसेच म्यूकर मायकोसिस उपचारासाठीच्या इंजेक्शनची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत आ. सावे , आ. बागडे, आ. बोरनारे यांनी सूचित केले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विशेष पूर्वतयारी ठेवावी. कृती दलाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक काम करावे. लहान मुलांना या संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत ऑनलाईन शिक्षण देत असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून जनजागृती करावी, अशी सूचना श्री. दानवे यांनी केली. तसेच नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. लग्न समारंभाच्या ठिकाणी नियमांचे पालन होण्यासाठी कॉन्स्टेबल नेमावा असेही त्यांनी सूचीत केले.

आ. बागडे यांनी रामनगर येथील लसीकरण केंद्र सुरु ठेवावे. तसेच जिल्ह्यातील मका खरेदी केंद्र सुरु करण्याची सूचना केली. आ. राजपूत, आ. बोरनारे यांनी दुसरा डोस घेणाऱ्यांना वेळेत लस उपलब्ध करुन द्यावी, असे सूचीत केले.

डॉ. येळीकर यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सर्तकता बाळगत लहान मूलांची काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये संसर्ग झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या पुढील उपचारांसाठीच्या इंजेक्शनची व्यवस्था आता पासूनच करण्याबाबत सूचित केले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज