कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांना यश – प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे
प्रकाशन दिनांक : 18/08/2020
गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्याचे आवाहन
औरंगाबाद, दि.17 (जिमाका) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपायोजनांना यश येत आहे. तरी पुढील काळात गाफील न राहता प्रसार पुर्णपणे रोखण्यासाठी अँटीजन चाचण्या वाढविण्यात येतील. त्याच बरोबर सध्याच्या अँटीजेन चाचण्यातील अँटीबॉडीजचा अंतीम अहवाल आल्यास त्यावरुन पुढील दिशा ठरविणे ही उपयुक्त ठरणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले. येणाऱ्या गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधी सोबतच्या आढावा बैठकीत श्री. गव्हाणे बोलत होते. यावेळी खा.डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ.अंबादास दानवे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाठ, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, महानगरपालीकेच्या आरोग्य अधिकारी निता पाडळकर, महानगर पालिकेचे शहर अभियंता एस. डी. पानझडे तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. गव्हाणे यांनी महानगरपालीका क्षेत्र व ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. त्यात शहरी भागात आता केवळ तीन तर ग्रामीण भागात 19 कंटेन्मेंट झोन असून यात पंधरा दिवसांत बाधीत रुग्ण न आढळल्यास कंटेनोट झोन कमी कमी होत जाईल, असे सांगितले. तसेच कोरोनाबाधीत रुग्णांना खाजगी रुग्णालयाकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त बिले आकारण्यात येत असल्यास, औषधांची उपलब्धता याबाबतीत संबंधीत अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. खाजगी रुग्णालयातील कोरोनाबाधीत रुग्णास प्लाझ्मा हवे असल्यास ते उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील व प्लाझ्मा देण्यासाठी रुग्णांना कसलाही भेदभाव केला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार श्री. जलील यांनी प्लाझ्मा गोळा करण्याची परवानगी केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासच असून त्यांच्याकडून खाजगी रुग्णालयातील रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करणे आवश्यक असल्याची अथवा खाजगी रुग्णालयातही प्लाझ्मा कलेक्शन करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. कोरोना रुग्णांना आवश्यक औषधांचे दर व साठा याबाबत लक्ष देण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली. खासदार भागवत कराड व आमदार अतुल सावे, आमदार दानवे यांनी कोरोना प्रसार रोखण्यात यश आले तरी गाफील न राहता अँटीजेन चाचण्यांत वाढ करण्याची मागणी केली. तसचे येणाऱ्या गणेशोत्सव काळात माहानगरपालिका व स्थानिक पोलीस स्टेशन यांनी आपल्या भागात गर्दी होणार नाही,तसेच गणेश विसर्जनासाठीचीही गर्दी टाळण्यासाठी आपल्या भागात मूर्ती विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. कोरोनाबाधित रुग्णांचेअत्यंसंस्कार कुठे करावे याबाबत त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे, तसेच स्मशानभूमीत विद्यूत दाहिनी उपलब्ध करण्याची सूचना श्री. कराड यांनी यावेळी केली. तसचे आमदार संजय शिरसाठ यांनीही खाजगी रुग्णालयांत कोरोना बाधीत रुग्णांना जास्त बीले आकारण्यात येत असल्याची तक्रार करीत सर्वच रुग्णालयाचे ऑडीट कडकपणे राबविण्याच्या सुचना केली.
