बंद

कुंभेफळ गाव कोरोनामुक्तच राहणार

प्रकाशन दिनांक : 14/06/2021

  • सरपंच कांताबाई मुळे यांनी व्यक्त केला विश्वास
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी साधला ऑनलाईन संवाद

औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : औरंगाबाद शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभेफळ गावात आज एकही कोरोना रुग्ण नाही. औरंगाबाद शहरापासून गाव जवळ असल्याने कोरोना संसर्गाचा अधिक धोका कुंभेफळ गावाला होता. परंतु योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गाव कोरोनामुक्त झाले, यापुढेही राहील, असा विश्वास कुंभेफळच्या सरपंच कांताबाई मुळे यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त कार्यालयात व्ह‍िडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागातील सरपंचाशी संवाद साधला. यावेळी श्री. ठाकरे यांच्याशी श्रीमती मुळे यांनी कुंभेफळ गाव कोरोनामुक्त झाल्याचे सांगतिले. तसेच गावाची लोकसंख्या नऊ हजार आहे. मागील महिन्यात जवळपास 90 कोरोना रुग्ण गावामध्ये होते. परंतु शासनाच्या निर्देशाचे व नियमांचे तंतोतंत पालन गावाने केले. गावातील कोरोना रुग्ण कमी कसे होतील, यासाठी सर्व उपाययोजनांवर अधिक भर दिला. 45 वर्षांहून अधिक नागरिकांच्या तपासण्या केल्या. लसीकरण करून घेतले. ग्रामस्थांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधी वाटप केली. गावात सोडियम हायपो क्लोराइडची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर गावात दक्षता समिती स्थापन करून त्यांच्याकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. चेकपोस्टची निर्मिती केली. बाहेर गावावरून गावात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण त्यांच्या शेतात व जिल्हा परिषदेच्या शाळेत, कॉलेजमध्ये केले. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायतमार्फत करण्यात आली. ग्रामपंचायततर्फे बांधण्यात आलेल्या दवाखान्यात ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र असे 40 खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन केले. गरजुंना अन्नधान्याचे वाटप केले. मास्क्‍ न वापरणाऱ्या नागरिकांना दंड केला. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वीरित्या राबवली. लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात जनजागृती केली, नागरिकांना मास्क, सॅनिटायजरचे वाटप केले, असेही श्रीमती मुळे यांनी सांगत कुंभेफळच्या कोरोनामुक्तीची वाटचाल सांगितली.

ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम : राज्यमंत्री अब्दुल सत्तार

राज्य भरात आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा भविष्यातील संभाव्य कोरोना संसर्ग आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी सज्ज आहे. कोरोनामुक्त गाव संकल्पनेतून गावागावात सरपंच उत्कृष्ट कार्य करत आहेत. आपत्तीकाळात ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात कार्य केले आहे, त्यांच्याबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले. या संवादावेळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त (विकास) डॉ. अविनाश गोटे यांचीही उपस्थिती होती.

कुंभेफळ गाव कोरोनामुक्तच राहणार