बंद

कारागृहात कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात -जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशन दिनांक : 10/07/2020

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला बंदींशी संवाद: जाणुन घेतल्या समस्या

औरंगाबाद (जिमाका) दि.5: जिल्हा मध्यवर्ती कारागृहात राबविण्यात येत असलेल्या कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात जेणेकरुन कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले.
हर्सूल कारागृहातील कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी आढावा घेऊन आवश्यक त्या सुचना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज अचानक कारागृहाला भेट दिली. यावेळी कारागृह अधिक्षक हिरालाल जाधव, डॉक्टर्स आणि इतर अधिकारी उपस्थित होते. सर्व प्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना कारागृहात योग्य प्रकारे अमलात आणल्या जात आहेत. प्रत्येक कैद्यांची नियमितपणे ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान मोजणे तसेच रोज सर्वांची स्क्रिनिंग करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या त्या सूचनांचे तंतोतंत पालन कारागृह प्रशासनाकडून होत आहे. कोविड व्यतिरिक्त आजारांवर देखील तात्काळ उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यापूर्वी बाहेरुन येणाऱ्या भाजीपाला, फळांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा कारागृहात शिरकाव झाला असेल तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले आणि त्या संबंधित योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचे आढळुन आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी 60 वर्षांवरील बंदीवानांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षाला भेट देऊन त्यांच्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘ हे वयोवृध्द बंदी आरोग्याच्या दृष्टिने ठणठणीत असल्याचे आढळले. बंदींनी आरोग्याच्या समस्यांशिवाय त्यांच्या काही वयक्तिक समस्या मांडल्या ज्यामध्ये प्रामुख्याने अपील संबंधित, वकील लावण्यासंबंधित, घरच्यांशी जास्त वेळ बोलू द्यावे अशा समस्यांचा समावेश होता. ह्या समस्या सोडविण्यासाठी योग्य ते निर्देश कारागृह प्रशासनाला दिले. प्रत्येक बॅरेकमध्ये कैद्यांचे नियोजन व्यवस्थितपणे करावे,ते एकत्र येणार नाही ही दक्षता घ्यावी, बाहेरच्या व्यक्तीशी संपर्क होऊ न देणे असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
कोविडमुक्त झालेल्या बंदिंसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ह्या सर्व बंदींना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या बंदींशी देखील संवाद साधला. तसेच कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशीही जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.