बंद

कल्याणकारी शासन योजनांची माहिती देणारे उपयुक्त प्रदर्शन – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशन दिनांक : 02/05/2022

  • शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त आयोजित प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन.

औरंगाबाद, दि.01 मे, (विमाका) :- ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहचविणारे उपयुक्त प्रदर्शन असून उस्फुर्तपणे प्रदर्शनात जनतेने सहभागी होण्याचे आवाहन उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय संचालक कार्यालय औरंगाबादच्या वतीने आयोजित शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त शासन योजनांची माहिती देणाऱ्या चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन सिमंत मंगल कार्यालय, औरंगपूरा, औरंगाबाद येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमास आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

शाहीर यशवंत सुरेश जाधव यांच्या पोवाडा गायनाने निर्माण झालेल्या जल्लोषपूर्ण वातावरणात पालकमंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन फित कापून, दिप प्रज्वलनाने करण्यात आले.

राज्यशासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध विभागांनी राबविलेल्या निर्णयांची माहिती देणारे ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात विविध योजनांची सचित्र माहिती जनतेला उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल. त्याचप्रमाणे विविध घटकांसाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्यापक स्वरुपात थेट जनतेपर्यंत उपलब्ध होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागीय माहिती कार्यालय औरंगाबाद या कार्यालयाने राबविलेला हा अभिनंदनीय उपक्रम असल्याचे श्री.देसाई यावेळी म्हणाले.

कोरोना काळात शासनाने केलेल्या विकासकामांसह विविध जनकल्याणार्थ योजनांची माहिती एकाच ठिकाणी चित्रमय प्रदर्शनातून उपलब्ध होणार असून जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी केले.

राज्यभरातील विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती त्यासोबतच औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांतील उल्लेखनिय कामांची माहिती चित्रमय स्वरुपात या प्रदर्शनात नागरिकांना बघावयास मिळणार आहे. तरी नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी  केले.

कृषि, महसूल, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास, ऊर्जा, अन्न व नागरी पुरवठा, कामगार कल्याण, सामाजिक न्याय, आदिवासी, जलसंधारण, क्रिडा, उद्योग, मराठी भाषा, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, सहकार व पणन, गृहनिर्माण, महिला व बाल विकास, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, नगर विकास, मत्स्यव्यवसाय, नगर विकास, आदी विभागांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती  सचित्र मजकूराच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आली आहे.

हे राज्यस्तरीय प्रदर्शन नागरिकांसाठी 1 ते 5 मे 2022 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांनी विविध कल्याणकारी शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी केले आहे.