बंद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत अंदाजे एकूण 61.87 टक्के मतदान

प्रकाशन दिनांक : 25/04/2019

औरंगाबाद, 23 (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अंदाजे  सरासरी  एकूण  61.87 टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नीलेश श्रींगी आदींची उपस्थिती होती.        

श्री.चौधरी म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत 3 लाख मतदारांनी नविन नोंदणी करुन देखील यंदा 3 टक्के मतदान अधिक झाले आहे. बहिष्कार घातलेल्या गावांपैकी शरीफपूर वाडी वगळता सर्व गावांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसून सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत वातावरणात पार पडली. औरंगाबाद शहरात व्हिडीओ शुट करणाऱ्या एका अज्ञात इसमाविरुध्द वैजापूरात एका व्यक्तीकडून पैसे वाटप असल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर केवळ 0.30% मतदान यंत्रात बिघाड लक्षात आला. हे यंत्र तातडीने बदलण्यात आले. प्रशासनामार्फत मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व  प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या. यामध्ये विशेष करुन प्रशासनामार्फत दिव्यांगासाठी निशुल्क रिक्षा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. जवळपास 5 हजार दिव्यांगांनी याचा लाभ घेतला. मतदान प्रक्रिया सुरू असताना 264 मतदान केंद्रांची वेबकास्टींगही करण्यात आली. एकूणच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी शांततेत व उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सर्व नागरिकांचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आभार मानले.

विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 2 हजार 21 मतदान केंद्रातून मतदान प्रकिया पार पडली. 19- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील कन्नड विधानसभा मतदारसंघात 63%, औरंगाबाद मध्य 63%, औरंगाबाद पश्चिम 62%, औरंगाबाद पूर्व 59%, गंगापूर 63% आणि वैजापूर 61% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असे श्री.चौधरी यांनी सांगितले.

मतदारांचे  निर्भयपणे मतदान

19 – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 86 हजार 284 मतदार होते. यात पुरुष मतदार संख्या 9 लाख 92  हजार 583 तर महिला मतदार संख्या 8 लाख 82 हजार 258  तसेच इतर 25  मतदारांचा समावेश होता.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारसंघात विविध उपक्रम राबविले. तसेच रण फॉर डेमोक्रसी मॅरेथॉन, राईड फॉर डेमोक्रसी सायक्लेथॉन काढून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी निर्भयपणे मतदान केले .

****

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत अंदाजे एकूण 61.87 टक्के मतदान