बंद

औरंगाबाद लवकरच लसीकरणयुक्त होईल – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशन दिनांक : 26/01/2022

पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनांची मंत्रिमंडळात दखल
दोन्ही पालक गमावलेल्या 20 पाल्यांना मदत
शिवभोजनमधून लाखो गरिबांना लाभ
‘आझादी का अमृत महोत्सव’ स्वावलंबानाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
मतदार यादी शुद्धीकरणात जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्याची विविध विकासात्मक कार्याच्या माध्यमातून घोडदौड सुरू आहे आणि कायमच सुरू राहणार आहे. कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असे सांगतानाच ‍जिल्हा प्रशासनाच्या कामाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कौतुक केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतल्यास जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने लवकरच जिल्हा लसीकरणयुक्त होईल, अशी अपेक्षाही उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केली.

पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले, यावेळी श्री. देसाई बोलत होते. कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून केलेल्या शुभेच्छा संदेशात देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शासनाने मागील दोन वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यामुळे कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संकटालाही खंबीरपणे सामोरे जाता आले. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल आहे. जिल्ह्याने कोरोना लसीकरणाला प्राधान्य देऊन संपूर्ण जिल्हा कोरोना लसीकरणयुक्त व्हावा, यासाठी विशेष पुढाकार घेतला. जनतेनेही लसीकरणामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांनी लस घेण्यासाठी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची दखल मंत्रिमंडळात घेतली याचा मी स्वत: साक्षीदार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली. सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे 10 लाखांच्यावर लसीकरण झाले. याकाळात पहिला डोस घेणारे लाभार्थी आता दुसऱ्या डोससाठी पात्र ठरणार आहेत. 45 वर्षांवरील नागरिक, कोरोना योद्धे आदींसह 81 टक्क्यांहून अधिकांनी पहिला, 45 टक्क्यांनी दुसरा कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतला आहे.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी शासनाने पाच लाखांची मदत जाहीर केलेली आहे. त्यात जिल्ह्यातील 27 बालकांपैकी 20 बालकांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित बालकांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्वाभिमान आणि स्वातंत्र्यानंतर आता देश सातत्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू झालेला ‘आझादी का अमृत महोत्सव’ स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

मराठवाड्याचे हरितक्षेत्र कमी असल्याने जिल्ह्याने इको बटालियनच्या सहकार्याने जिल्ह्याचे हरितक्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. सामाजिक वनीकरणाने दिलेली उद्दीष्ट्ये पूर्ण केली. यामध्ये राज्य योजनेतून साडे पाच लक्ष, मग्रारोहयोतून तीन लक्ष, गोगाबाबा टेकडीवर सहा हजारांहून अधिक अशी जवळपास साडे लाखांवर रोपांची लागवड करण्यात आली आहे. शिस्तप्रिय असलेल्या बटालियनच्या जवानांनी निरगुडी, कोलठाण आदी ठिकाणी वृक्षलागवड केली आणि ती जगवली सुद्धा. हाच प्रयोग गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी राबवण्याचा निर्णय घेतला. या टेकडीवर कडूनिंब,वड, पिंपळ अशा सहा हजार देशी जातीची रोपे लावण्यात येणार आहेत. प्रत्येकाने वृक्षाचे महत्त्व जाणून त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही विनंती करतो. जिल्ह्यात 29 लाख मतदार आहेत. या सर्व मतदारांची फोटोसह मतदार यादी जिल्ह्याने बनविली आहे. मतदार नोंदणी व मतदार यादीचे शुध्दीकरण करणे या कामात जिल्हा राज्यात 29 व्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आला आहे. राज्यात मतदार नोंदणी व जनजागृतीचे काम उत्कृष्ट केल्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत सत्कार करण्यात आलेला आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

राज्यात जागतिक बँकेचा प्रकल्प असलेल्या ‘पोकरा’च्या अंमलबजावणीत सुरूवातीपासूनच औरंगाबाद जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे. या प्रकल्पावर आजपर्यंत 424 कोटी 90 लाखांचा ‍निधी 69 हजार 963 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात कांदा चाळ, संरक्षीत शेती, शेततळे अस्तरीकरण, अहिल्यादेवी रोपवाटिका, मनुष्यबळ विकास कार्यक्रम आदींसाठी तीन कोटींहून अधिक अनुदान वितरीत केले आहे. शेतकऱ्यांच्या फायदा विचार करून शासनाने मोफत सात बारा देण्याचे ठरविले. त्यानुसार जिल्ह्यात आठ लाख तीन हजार 644 सातबारांचे मोफत वाटप करण्यात आले. ज्याची टक्केवारी 92 टक्के एवढी आहे. तर 98 टक्के सातबारांवर डिजिटल स्वाक्षरी झालेली आहे.

शिवभोजन शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. सर्व तालुक्यांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. या योजनेला सुरूवात होऊन आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. याचा आनंद होतो आहे. आजपर्यंत या योजनेचा जवळपास 22 लाख 32 हजार गरीब, गरजूंनी लाभ घेतला आहे. बांधकाम कामगारांना साडेतीन कोटी, घरेलू कामगारांना 36 लाख असे एकूण चार कोटी रूपये त्यांना देण्यात आले आहेत. खरीप, रब्बीसाठी एक हजार 616 कोटी रुपये कर्ज वाटपाचा लक्षांक दिलेला असताना जिल्ह्यातील दोन लाख 19 हजार 255 शेतकऱ्यांना एक हजार 272 कोटी रुपये एवढे कर्ज वाटप केलेले आहे. राज्यात कर्ज वाटपात जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील दोन लाख 36 हजार 984 शेतकऱ्यांना 982 कोटी रुपये रकमेचा महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून लाभही दिलेला आहे.

‘कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020’ नुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून एकत्रित वसूल झालेल्या 33 टक्के रक्कम महावितरणच्या विभागीय पातळीवर त्या ग्रामपंचायतीत कृषीपंप ग्राहकांसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी वापरला जातो. जिल्ह्यात अशा प्रकारे 54 कोटींचा निधी जमा झाला आहे. त्यापैकी 17 कोटी रुपये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विकासासाठी मिळणार आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यातील पाच लाख 93 हजार 665 शेतकऱ्यांना 378 कोटी 67 लाखांहून अधिक रकमेचे अनुदान देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते ‍पिकेल’ अभियानांतर्गत शेतकऱ्यांना नफ्याचे पीक असलेल्या ओवा ‍पिकाची लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या पिकाची जिल्ह्यात 215 एकरांवर लागवड झाली, हे विशेष.

आरोग्‍य सुविधांच्या बळकटीकरणासोबतच जिल्ह्याचे अर्थचक्र ज्यावर आधारित आहे असे उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे काम करणाऱ्या एमसीइडीतून लाखो प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात आले. या केंद्रात 300 प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणाची तर 100 प्रशिक्षणार्थींची ‍निवासी प्रशिक्षणाची सोय शासनाने केली आहे. यातून व्यवसायासाठी मार्गदर्शन, वृद्धी होण्यास उद्योजकांना मदत होणार आहे.

ऑरिक सिटी शेंद्रा येथे एसीजी युनिव्हर्सल कॅप्सूल या फार्मा कंपनीला 20 एकर जागेचे वाटप करण्यात आलेले आहे. त्या कंपनीची 600 कोटीची गुंतवणूक आहे. ऑरीकमध्ये आजपर्यंत 125 कंपन्यांना भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत. तर पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व सहा हजारांची थेट रोजगानिर्मिती झालेली आहे, असेही देसाई म्हणाले.

सुरूवातीला पालकमंत्री श्री. देसाई यांचे विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर श्री. देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर श्री. देसाई यांच्याहस्ते नक्षलग्रस्त भागात खडतर, कठीण, कर्तव्य बजावल्याने विशेष सेवा पदक व उत्कृष्ट सेवा केलेले पोलिस आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, अंमलदार सर्वश्री सचिन पागोटे, अशोक अवचार, अमोल सोनवणे, पुंडलिक डाके, देविदास शेवाळे, रोहित गांगुर्डे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.

युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एल्ब्रूस’ येथे 75 वा स्वातंत्र्य दिवस व अमृत महोत्सव वर्ष साजरा करणारे पहिले भारतीय एमआयडीसीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातील सहायक अंबादास गायकवाड, जिल्हा सैनिक कार्यालयातील शिपाई विकास कापसेंना राष्ट्रपतींच्याहस्ते सेना पदक 2020 मध्ये देऊन गौरविण्यात आले होते. या पदकाप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना बारा लाख रूपये रकमेचा धनादेश देऊन पालकमंत्री देसाई यांनी सन्मानित केले.

कार्यक्रमानंतर श्री. देसाई यांनी सर्व निमंत्रितांची भेट घेऊन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.

‘निरामय आरोग्य’चे उद्घाटन

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते पोलिस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात ‘निरामय आरोग्य’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी पोलिसांनी तंदुरूस्त राहणे आवश्यक असल्याने या उपक्रमाचा पोलिसांनी लाभ घ्यावा. दररोज व्यायाम करून तंदुरूस्त राहावे. त्यामुळे जनतेलाही अधिक चांगली सुविधा देता येईल, असे पालकमंत्री देसाई म्हणाले. यावेळी त्यांच्याहस्ते ‘निरामय आरोग्य’ पोस्टर, पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.