बंद

औरंगाबाद जिल्ह्यात 11 मार्चपासून अंशत: लॉकडाऊन

प्रकाशन दिनांक : 08/03/2021

  • नागरिकांनी त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
  • सर्व शनिवार, रविवारी राहणार कडक लॉकडाऊन
  • जाधवमंडी 11 ते 17 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद
  • जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही राहणार बंद

औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात 11 मार्च ते 04 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. तसेच शनिवार, रविवारी कडक स्वरूपात लॉकडाऊन करण्यात येणार आहे, असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज माध्यमांना दिली. त्याचबरोबर नागरिकांनी त्रिसूत्रीची काटेकोरपणे दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करावी, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्या देवगिरी निवासस्थानी श्री.चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा पोलिस आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाला अंशत: लॉकडाऊन करावे लागत आहे. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी प्रशासनाला सक्रीय सहकार्य करावे.

जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण बदलते असून संसर्गामध्ये कुटुंबच्या कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढत आहे. त्यादृष्टीने वाढीव चाचण्यांची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून कोविड -19 आपत्तीचा प्रशासन यशस्वीरित्या सामना करत आहे. आजघडीला जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपचार सुविधा आहेत. मात्र, याच गतीने संसर्ग वाढल्यास वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा उपलब्ध करून देणे जिकरीचे ठरू शकते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी वेळीच नागरिकांनी खबरदारी घेत हात वारंवार धुणे, मास्कचा योग्य वापर करणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या नियमांचे कटाक्षाने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्णत: लॉकडाऊनचा पर्याय प्रशासनासमोर खुला आहे, सुरळीतपणे सर्व दैनंदिन व्यवहार, रोजगार सुरू राहण्याच्या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी प्रभावीरित्या जनजागृती, प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील (शहर तसेच ग्रामीण) सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था (कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) व इतर तत्सम संस्था सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. मात्र, या संस्थांद्वारे ऑनलाईन स्वरूपात कामकाज सुरू ठेवता येईल.  राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन तसेच शिक्षण मंडळ स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षा कोविड 19 विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेता येतील. औरंगाबाद जिल्ह्यातील (शहर तसेच ग्रामीण)  सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे, धरणे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावरही प्रतिबंध घालण्यात येत आहे. तसेच आठवडी बाजार, जलतरण तलाव (Swimming Pool), क्रीडा स्पर्धा बंद राहतील (मात्र, खेळाडूंच्या नियमित सरावास कोविड 19 च्या शिष्टाचाराच्या पालनासह परवानगी राहील).  सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्स पूर्णपणे बंद राहतील. तसेच कोणत्याही सार्वजनिक विवाह समारंभास परवानगी असणार नाही. तथापि नोंदणीकृत पद्धतीने विवाहास परवानगी असेल. औरंगाबाद शहरातील जाधवमंडी 11 मार्च ते 17 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहील, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

अटी व शर्तींसह सुरू असणाऱ्या बाबी (Do’s with terms & conditions)

जिल्ह्यातील (शहर तसेच ग्रामीण भागातील) हॉटेल,  बार, परमीट रुम, रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह, दुकाने व इतर आस्थापने सकाळी 6.00 ते रात्री फक्त 09.00 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच रेस्टॉरंटस्‍, हॉटेल्स, खाद्यगृहे एकूण आसन क्षमतेच्या 50% पर्यंत सुरू ठेवता येतील. (प्रत्यक्ष डायनिंग सुविधा रात्री फक्त 09.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, होम डिलिव्हरी व त्यासाठी स्वयंपाकगृहे/किचन रात्री 11.00 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा आहे.) जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांच्या अभ्यासाठी वापरात असलेले सर्व वाचनालये, अध्ययन कक्ष एकूण आसन क्षमतेच्या 50% इतक्या क्षमतेच्या मर्यादेने सुरू ठेवता येतील.

सर्व शनिवार, रविवारी पूर्णत: लॉकडाऊन

दिनांक 11 मार्च ते 04एप्रिल 2021 पर्यंत फक्त शनिवारी व रविवारी खालील सेवा / आस्थापना बाबत पुढील कोष्टकात निर्देशीत केल्याप्रमाणे Covid-19 च्या शिष्टाचाराच्या पालनासह संचालनास विशेष परवानगी राहिल.

अ.क्र.

काय सुरु राहतील

काय बंद राहील

1)      

वैद्यकीय सेवा

दुकाने व बाजारपेठा, D-Mart/ Reliance/Big Bazar/More इ.

2)     

वृत्तपत्र, मिडीया संदर्भातील सेवा

मॉल्स, चित्रपटगृहे / नाट्यगृहे

3)      

दूध व्रिक्री व पुरवठा इ.

हॉटेल, रेस्टॉरंट (प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलिव्ही व त्यासाठी स्वयंपाकगृहे/ किचन रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा राहील.)

 

4)    

भाजीपाला विक्री व पुरवठा

सर्व खाजगी कार्यालये/ आस्थापना

5)     

फळे विक्री व पुरवठा

 

6)     

जीवनावश्यक वस्तुंची दुकाने

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

7)     

पेट्रोल पंप, गॅस एजन्सी

8)     

सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय), रिक्षासह इ.

9)      

बांधकामे

10)  

उद्योग व कारखाने

11)  

किराणा दुकाने (फक्त Stand Alone स्वरुपातील)

12)  

चिकन, मटन, अंडी व मांस व मच्छी दुकाने

13)  

वाहन दुरुस्ती दुकाने / वर्कशॉप

14)            

पशुखाद्य दुकाने

15) 

बँक व पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहिल.

RT-PCR चाचणी बंधनकारक

ज्या आस्थापनांना सदर कालावधीत (11 मार्च ते 4 एप्रिल 2021) व्यवसाय सुरु राहणेसाठी परवानगी देण्यात आली आहे, त्या आस्थापनांशी संबंधीत सर्व मालक, चालक, कर्मचारी, मजूर व तेथील कार्यरत सर्व व्यक्तींना Covid-19 चे अनुषंगाने दर 15 दिवसांनी  RT-PCR वारंवार तपासणी करणे बंधनकारक राहिल व नजिकचा (Latest) तपासणी अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल.

ज्या आस्थापना व नागरिक आदेशाचे उल्लंघन करतील ते सर्व संबंधित, इतर अनुषंगिक दंडात्मक कार्यवाहीसह, साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भा.द.वि. 1860 मधील तरतुदींअन्वये त्यांचेवर गुन्हा दाखल केला जाईल.

या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्यास्तव औरंगाबाद महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधीत झोनचे सहाय्यक आयुक्त व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, सर्व संबंधित पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी, विविक्षीतपणे नेमलेले अधिकारी/कर्मचारी, ग्राम व नगर विकास विभागाचे सर्व अधिकरी/कर्मचारी आणि महसूल अधिकारी/कर्मचारी या आदेशाची नोंद घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत दक्षता घेतील व आवश्यक कार्यवाही करतील. प्रस्तुत आदेश गुरुवार दिनांक 11 मार्च 2021 पासून अंमलात येतील, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात 11 मार्चपासून अंशत: लॉकडाऊन