बंद

औरंगाबाद,लातूरच्या पाणी पुरवठा योजनांचे अंदाजपत्रक सादर करा – डॉ. भागवत कराड

प्रकाशन दिनांक : 12/02/2019

औरंगाबाद, दिनांक 11-  लातूर,औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा लवकर व्हावा. त्यासाठी नियोजित योजनांचे ढोबळ अंदाजपत्रक सादर करावेत, अशा सूचना मराठवाडा विकास मंडळाचे  अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

मराठवाडा विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित सिंचन योजनांचा आढावा बैठकीत श्री. कराड बोलत होते. यावेळी मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे, मंडळाचे सचिव डी.एम.मुगळीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पी.डी. भामरे, औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उस्मानाबादचे पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता कृष्णा घुगे आदींची उपस्थिती होती. 

लातूरचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लातूरला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक एक अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनगिरीच्या पुढील वितरण कुंडापासून धनेगाव-मांजरापर्यंत जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच यासाठी आवश्यक असणारे ढोबळ अंदाजपत्रक तयार करून मंडळाला तत्काळ सादर करावे.

औरंगाबादकरांनाही मुबलक पाणी मिळण्याच्या दृष्टीने पुढील 25 वर्षांचे नियोजन करून जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या लागणाऱ्या खर्चाबाबतही मंडळाला तत्काळ ढोबळ अंदाजपत्रक सादर करावे, अशा सूचना डॉ. कराड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी श्री.मुगळीकर, श्री. नागरे यांनीही योजना मार्गी लावण्याबाबत आवश्यक त्या कार्यवाहीबाबत सांगितले.

 

औरंगाबाद,लातूरच्या पाणी पुरवठा योजनांचे अंदाजपत्रक सादर करा- डॉ. भागवत कराड