• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

ओबीसी महामंडळाच्या कर्ज प्रस्तावाबाबत आवाहन

प्रकाशन दिनांक : 14/08/2020

औरंगाबाद, दि. 13 (जिमाका):- इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने (ओबीसी) 20 टक्के बीज भांडवल, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा व थेट कर्ज  योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव दोन प्रतीत दाखल करावेत. यावेळी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात सादर केल्याशिवाय कर्ज प्रस्ताव अर्जदाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीकडून स्वीकारले जाणार नाहीत, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.

सर्व    कागदपत्रासह परिपूर्ण असलेले कर्ज प्रस्ताव  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. उद्दिष्टांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा लाभार्थी निवड समितीच्या उपस्थित सदस्यांसमोर त्यांच्या मान्यतेने लाभार्थीची निवड करण्यात येईल पात्र व निवड झालेल्या अर्जदारांची तालुकानिहाय यादी जिल्हा कार्यालयाच्या सूचना फलकावर निवड समितीच्या मान्यतेनंतर त्वरीत लावण्यात येईल. कर्ज प्रस्ताव पुढील मंजुरीकरीता योजनानिहाय बँकेकडे, महामंडळाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात येतील. या योजनेअंतर्गत मंजूरीपूर्व व (वैधानिक कागदपत्रे) मंजूरीनंतरचे दस्तावेजबाबतच्या महामंडळाच्या अटी व शर्तीची माहिती कार्यालयाच्या सूचना  फलकावर उपलब्ध  आहे.

महामंडळामार्फत सन 2020-21 या वित्तीय वर्षाकरीता महामंडळाच्या थेट कर्ज योजनेत 70 प्रकरणाचे, बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या 20 टक्के बीज भांडवल योजनेअंतर्गत 35 प्रकरणे, नव्याने सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन वैयक्तिक व्याज परतावा योजनेत 70 गट कर्ज  व्याज परतावा 12 प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त आहे. यापूर्वी कोणत्याही प्रकारचा लाभ न घेतलेल्या वय 18 ते 50 वर्ष असलेल्या इतर मागासवर्गीय कुटुंबातील वैयक्तीक अर्जदारांना उद्योग व व्यवसाय करण्यासाठी प्राप्त उद्दिष्टानुसार विविध बँकांना तालुकानिहाय तसेच थेट  कर्ज योजनेत कर्ज उपलब्ध केले जाईल.

इच्छुक अर्जदारांनी कर्जाची मागणी करते वेळी जातीचे प्रमाणपत्र व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, औरंगाबाद यांच्याशी दूरध्वनी क्रं. 0240-2341544 वर संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे चौकशी करावी किंवा ऑनलाईन योजनेकरीता महामंडळाच्या वेबपोर्टल www.msobcfdc.org  या संकेतस्थळावर अर्ज करावा, असेही कळविले आहे.