एमसीएमसी समितीने जाहिरात प्रमाणीकरणाबरोबरच पेडन्यूज वर ही बारकाईने लक्ष ठेवावे उप जिल्हाधिकारी निलेश श्रींगी
प्रकाशन दिनांक : 01/04/2019
औरंगाबाद दि.२६ (जि मा का ) जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहीरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याबरोबरच मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमात उमेदवार व राजकीय पक्षाबाबत आलेल्या वृत्त, विशेष वृत्त व लेखा अदि मजकूराची तपासणी करुन त्यातील पेडन्यूज वर बारकाईने लक्ष ठेवावे, उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या बैठकीत उप जिल्हाधिकारी निलेश श्रींगी बोलत होते.
यावेळी समिती प्रा. प्रशांत पाठक, सहायक संचालक रमेश जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदि उपस्थित होते.
उप जिल्हाधिकारी निलेश श्रींगी म्हणाले की, एमसीएमसी समितीने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमावर पसिध्द करण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहिरातीचे प्रमाणीकरण करुन दयावे. त्याप्रमाणेच मुद्रीत , इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीच्या स्वरुपातील व मोबदला देऊन प्रसिध्द केलेल्या बातम्यांची तपासणी करुन संशयित पेड न्यूज वर बारकाईने लक्ष ठेवावे. व त्या पेडन्यूज असल्याचे आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे सिध्द होत असेल तर संबंधित उमेदवारांना नोटीस देण्याबरोबरच पेड न्यूज वरील तो खर्च संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चात नोंद करण्याबाबत निवडणूक खर्च समितीला कळविले पाहीजे, असे उप जिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांनी सांगितले.
नोंदणीकृत राष्ट्रीय अथवा राज्यस्तरावरील पक्ष आणि निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या पूर्वी किमान ३ दिवस आधी जाहिरात प्रमाणीकरणासाठी अर्ज करावा.तसेच बिगर नोंदणीकृत राजकीय पक्ष अथवा अन्य व्यक्तींनी जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी किमान 7 दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. सदरील विहित वेळेत प्रमाणीकरणासाठी आलेल्या जाहिराती ४८ तासांच्या आत प्रमाणीत करुन देण्याची जबाबदारी एमसीएमसी समितीची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रसारमाध्यमांतून प्रचार, प्रसिध्दी करण्यासाठी जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रसारमाध्यमांनीही राजकीय, पक्ष व उमेदवारांच्या प्रसिध्दीसाठी आलेल्या जाहिराती एमसीएमसी समितीकडून प्रसारणाचे प्रमाणपत्र मिळाल्याची खात्री करावी व त्यानंतरच जाहिराती प्रसिध्द कराव्यात व निवडणूक विभागाला निर्भिड, मुक्त व नि:पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री श्रींगी यांनी केले.
प्रारंभी माध्यम प्रमाणीकरण समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी श्री. मुकुंद चिलवंत यांनी एमसीएमसी समितीच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच या समिती कक्षाची स्थापना माध्यम कक्ष, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथे करण्यात आली असल्याची सांगितले
****
