बंद

‘एकात्मिक बालविकास, बेटी बचाओ’ सह ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 22/09/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) : –  एकात्म‍िक बालविकास सेवा, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास साधावा. त्याचबरोबर शासनाच्या महत्वाकांक्षी अशा ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत सर्वांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून कोविड 19 ला आळा घालण्यास हातभार लावावा. तसेच माझे कुटुंब माझी जबाबादारी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अभिसरण समिती, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेच्या जिल्हास्तरीय आढावा श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, अंगणवाडी बळकटीकरणासाठी प्रयत्न करा. बालकांच्या विकासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात. यासाठी लोकशिक्षणावर अधिक भर द्यावा. समाजात जागृती निर्माण करावी. बालके कुपोषित राहणार नाहीत, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. बालकांना चांगले अन्न मिळावे, यासाठी चाकोरीबाहेर जाऊन पुढाकार घेण्यात यावा, असेही श्री.चव्हाण म्हणाले. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करावी. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत. मुलींच्या जन्माचा आदर करण्याबरोबरच समाजातील गुणवंत कन्यांचा सत्कार करण्यात यावा, असेही श्री.चव्हाण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा

बालविकास, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनांची सांगड घालत शासनाच्या महत्त्त्वाकांक्षी अशा माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे महत्त्व देखील सर्व माता, बालकांना पटवून देण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करावा. आशा, अंगणवाडी मदतनीस, सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी आदींसह सर्वांनीच या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या मोहिमेबाबतची सविस्तर माहितीदेखील पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना दिली. प्रत्येक कुटुंबाने स्वत्:ची जबाबदारी ओळखावी व ती स्वीकारावी, ज्यामुळे कोरोना आजाराला आळा घालण्यास मदत होईल, असेही श्री.चव्हाण म्हणाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांनीही या मोहिमेला आशा, अंगणवाडी सेविकांनी प्राधान्य द्यावे. यासाठी लागणाऱ्या सर्व साधनांची पूर्तता करण्यात आलेली आहे, त्यामुळे या मोहिमेच्या कामाला अधिक गती देण्यात यावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सभापती श्रीमती चव्हाण यांनीदेखील बैठकीत योग्य त्या सूचना संबंधितांना केल्या. बैठकीत योजनांच्या अंमलबजावणीबाबतची माहिती श्री. मिरकले यांनी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांना सविस्तर सादर केली.

'एकात्मिक बालविकास, बेटी बचाओ' सह 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम यशस्वी करा